मुंबई (वार्ताहर) : दिवाळीनिमित्त २२ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबर दरम्यान जादा बसेस चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी बलिप्रतिपदा आणि भाऊबीज निमित्त २६ ऑक्टोबरला बेस्टतर्फे १४० जादा बस धावणार आहेत. मुंबई शहर, उपनगरे आणि नवी मुंबईतील प्रमुख मार्गांवर जादा बससेवा चालवण्यात येणार आहेत.
या बस सेवा दादर प्लाझा, काळबा देवी, वांद्रे, मुंबईतील महात्मा फुले मार्केट आणि नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह शहरातील प्रमुख मार्गांवर धावतील, असे बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले. शहरातील विविध मार्गांना जोडणाऱ्या २५ विशेष बस सेवांमध्ये नवीन बस सेवा जोडल्या जातील. तसेच २६ ऑक्टोबरला बलिप्रतिपदा आणि भाऊबीज निमित्त १४० जादा बस सेवांचेही नियोजन करण्यात आले आहे. या बससेवा संपूर्ण शहरात धावणार आहेत.