Monday, April 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजलाल मातीची ललकारी...!

लाल मातीची ललकारी…!

अनुराधा परब

संस्कृती ही एकच गोष्ट माणसाला अन्य प्राणीमात्रांपासून वेगळे ठरवते. या वेगळेपणाची एक भाग भाषा आहे. मौखिक भाषांचा विचार करताना मुळातच जगामध्ये सर्वत्र एकच एक भाषा अस्तित्वात होती का, कोणती भाषा आधी होती, त्या भाषेचे वा भाषांचे स्वरूप काय होते, याबद्दल आजवर अनेक भाषातज्ज्ञांनी संशोधन, अभ्यास केलेला आहे. मात्र भाषेच्या उत्पत्तीविषयीचे खात्रीशीर स्पष्टीकरण अजूनपर्यंत देता आलेले नाही. लिखित साधनांच्या आधारे भाषेचा विचार करायचा, तर ती साधने काही हजार वर्षांची वाटचाल समोर ठेवू शकतात; परंतु त्यापूर्वीही अस्तित्वात असलेल्या भाषेच्या मुळापर्यंत जाणे शक्य झालेले नाही. संस्कृतीवहनाचे एक साधन भाषा आहे. तिचे प्राथमिक स्वरूप हे माणसाने त्याच्या भौतिक गरजांशी, व्यवहाराशी जोडलेले असल्याने दैनंदिन जीवनातील गरजांच्या उपयुक्ततेच्या निकषावर शब्द, त्यांचे अर्थ कालौघात टिकून राहिले, हेदेखील लक्षात येईल.

एकोणीसाव्या शतकात होऊन गेलेल्या लुईस हेन्री मॉर्गन या मानवशास्त्रज्ञाने सामाजिक – सांस्कृतिक उत्क्रांतिविषयक सिद्धांतामध्ये असे म्हटले आहे की, ‘निसर्गाने बहाल केलेली जीवनोपयोगी साधनसामग्री मनुष्याने स्वतःच्या वापरासाठी जसजशी रूपांतरित केली, विकसित केली तसतशी मानवी संस्कृतीची प्रगती होत गेली. त्यामुळेच मानवी प्रगतीच्या महत्त्वाच्या कालखंडांचा साक्षात संबंध निर्वाहोपयोगी साधनसामग्रीच्या विकासाशी जोडला गेला आहे.’ माणसाने निसर्गाशी जुळवून घेत जगत असताना सोयीनुसार शरीरबाह्य साधनांची (अवजारे, हत्यारे इ.) निर्मिती केली. कळपात राहणाऱ्या माणसाला याच शोधांच्या प्रत्यक्ष वापरादी गोष्टींसाठी संवादाची – भाषेची गरज निर्माण झाली. हा भाषेच्या निर्मितीचा पाया होता. इथूनच शब्दांचा वापर आणि त्यांचा सांस्कृतिक विनियोग होत वाटचाल सुरू झाल्याचे भाषातज्ज्ञ नोंदवतात. मराठी भाषा ही जर भारतातील २२ भाषांपैकी एक आणि जगात दहावी तर भारतात चौथ्या क्रमांकावर असेल, तर त्या मराठी भाषेतल्या ५४ समृद्ध बोलींपैकी एक मालवणी किंवा कुडाळी बोलीभाषा आहे.

संस्कृती ही केवळ त्यातील चालीरिती, परंपरा यांनीच जिवंत राहात नाही, तर त्या संस्कृतीच्या वहनामध्ये स्थानिक बोलीभाषा मौलिक भूमिका बजावत असते. किंबहुना, त्या त्या प्रदेशातील लोकगीतांमधून, मौखिक कथा – आख्यानांतूनही भाषा आपली स्वभाववैशिष्ट्ये जागती ठेवत असते. अनेक संस्कृतींचा संकर पाहिलेल्या कोकणातील बोलीभाषेने आधुनिक काळातदेखील त्यातला गोडवा, उत्स्फूर्तता, मार्मिकता जपलेली आहे. भौगोलिकतेचे निकष हे जसे खाद्यसंस्कृतीला लागू पडतात तसेच ते बोलीभाषेलाही लागू पडतात. आज भारतातील असंख्य भाषा आपल्या अस्तित्वासाठी लढत आहेत. १९६१ साली झालेल्या जनगणनेनुसार १६५२ भाषांची नोंद झाली होती, त्यापैकी आजमितीस केवळ ७८० भाषा शिल्लक राहिल्याचं वास्तव समोर आलं आहे. पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे २०१० अनुसार भारतातील १९७ भाषांचे अस्तित्व धोक्यात आले आहे, तर ४२ भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नामशेष होणाऱ्या भाषा या आपल्यासोबतच त्याच्याशी निगडित मौखिक परंपरा, कला, आहारादी गोष्टींनाही घेऊन लोप पावत असतात. ऑगस्ट महिन्यामध्ये मूळच्या ब्राझिलिअन ‘मॅन ऑफ होल’ अर्थात आवा समुदायातील शेवटच्या व्यक्तीच्या निधनाचे वृत्त बहुतेकांनी वाचले असेल.

निधनापूर्वी तब्बल २६ वर्षे या व्यक्तीचा बाह्य जगाशी कोणताही संपर्क राहिलेला नव्हता. आवा समुदायावर जमीन माफियांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये या व्यक्तीचे समाजबांधव मारले गेले. समुदायातील व्यक्तींची संख्या कमी होत होत अखेरीस अमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या या एकमेव व्यक्तीचेही नैसर्गिकरीत्या निधन झाले. ही घटना मानवी समाज, भाषा, संस्कृती या दृष्टिकोनातून पाहिल्यानंतर त्यातील दाहकता आणि त्यामुळे झालेले सामाजिक – सांस्कृतिक नुकसान कळू शकेल.

या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते गोवादरम्यान सिंधुदुर्गातील जातीप्रजातींनुसार बोलल्या जाणाऱ्या मालवणी बोलीचा विचार विविध स्तरांवर होण्याची निकड भासते. निरीक्षण, अनुभव आणि ज्ञान ही त्रिसूत्री कोणत्याही भाषेचा गाभा आहे. कारवार ते गोवा या पट्ट्यात बोलल्या जाणाऱ्या भाषेला सर्वसाधारणपणे कोंकणी असेच म्हटले जात असे. प्रत्यक्षात मात्र देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी वगैरे ठिकाणच्या मालवणी बोलीच्या उच्चारणात फरक आहे. सावंतवाडी – दोडामार्गाकडील मालवणी बोलीवर गोवन कोकणीचा प्रभाव अधिक आहे. तर कुडाळ, कणकवलीकडील मालवणी ही कुडाळदेशकरांची कुडाळी म्हणून ओळखली जाते. कोकणातल्या खलाटी आणि वलाटी या प्रांतिक भेदानुसारही या बोलीचे स्वरूप बदलते. बोलीचे उच्चारण, शब्दफेक, हेल काढून बोलण्याची ढब – शैली, लयीतले माधुर्य यावरूनही मालवणी बोलीचा बाज ओळखला जातो. या बोलीचे उच्चारण अनुनासिक स्वरूपाचे आहे. बोलींचा अभ्यास जसा भाषाविज्ञानाच्या आनुषंगाने केला जातो तसाच तो भौगोलिकता आणि शास्त्रीय दृष्टीनेही केला जातो.

इथल्या किनारपट्टीनजीक राहणाऱ्या लोकांच्या श्वसनेंद्रियावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यांचा परिणाम होतो आणि त्याचा प्रभाव बोलीवर अनुनासिकतेच्या स्वरूपात दिसतो. इथल्या कोळी, भंडारी वगैरे लोकांचं बोलणं ऐकल्यानंतर हे प्रादेशिक भाषा वैशिष्ट्य सहज लक्षात येईल. पूर्वीची आणि आजची मालवणी बोली यात बराच फरक पडत गेला आहे. परंपरिक शब्दप्रयोग, म्हणी, वाक्प्रचार, लोकगीतं, कथा ही या बोलीचा आस्वादक चेहरा आहेत. एकाच शब्दाची अनेक रूपे मालवणी बोलीत सापडतात. फाक मारणे, या वाक्प्रयोगालाही मालवणीमध्ये वेगळा अर्थ आहे. उदाहरणच द्यायचं तर द. रा. दळवी यांच्या मालवणी भोपळे या कवितेतील देता येईल. “मालवणकार येंकदा मारूक लागलो थाप। घरायेवढे भोपळे मोठे मालवणात मॉप!” होळीच्या वेळी मारल्या जाणाऱ्या फाका याहून वेगळ्या असतात. इथल्या सणउत्सवांमध्ये जुनी मालवणी बोली आज टिकून आहे. मालवणी म्हणजे शिव्यांची भाषा ही या भाषेची खरी ओळखच नाही. ओवयों, गाळींची ही प्रेमळ बोली आहे. या बोलीतच नाट्यात्मता आहे. म्हणींपासून ते गाऱ्हाण्यांपर्यंत, गजालींपासून ते ओवयोंपर्यंत जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करणारी मालवणी बोली लोकपरंपरांमध्ये टिकून आहे. या बोलीचा श्रीमंत वारसा सिंधुदुर्गातल्या कष्टकरी लोकांनी सातत्याने जपलेला, जोपासलेला आहे. बोली केवळ प्रादेशिक संस्कृतीच उलगडून दाखवत नाही, तर मानवी प्रवृत्ती – स्वभाववैशिष्ट्यांचा कॅलिडोस्कोपही दाखवते. “पैसो तुजो नाय घरी, बायको मजुरी करी, पोरां दुसऱ्यांच्या दारी…” यासारख्या ओळी मुंबैच्या चाकरमान्याकडून येणाऱ्या मनिऑर्डरीवर जगणाऱ्या, कर्जफेडीसाठी मुलाकडे शंभर रुपये तरी धाड अशी विनवणी करणाऱ्या एकेकाळच्या मालवणी माणसाच्या हलाखीचं वास्तव मांडतात. निसर्गाची संपन्नता सभोवती असूनही दुर्लक्षिला गेलेला इथला माणूस बोलीतून जीवनसंघर्षाची कहाणी सांगतो. लाल मातयेचे मन आणि गुण सांगणाऱ्या बहुआयामी वैशिष्ट्यपूर्ण मालवणी बोलीचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास होण्याची आज नितांत गरज आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -