पूनम राणे
विजय हा शाळेतील अतिशय हुशार विद्यार्थी. वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वादविवाद स्पर्धा या सर्व उपक्रमांमध्ये तो भाग घेत असे.
आज सकाळी हजेरी घेत असताना, त्याचा नंबर आला ‘येस मॅडम’ असा आवाज न आल्याने मॅडमनी विद्यार्थ्यांना विचारलं, ‘आज विजय शाळेत आला नाही?’
‘हो, तो नाही आला. असे वर्गातील विद्यार्थ्यांनी उत्तर दिले. सर्वांची हजेरी घेऊन विद्यार्थ्यांचे हजेरी बुक बंद करत असतानाच, ‘मॅडम आत येऊ?’ ‘हो, ये विजय. तुला शाळेत यायला उशीर का झाला?’ विजय काहीच बोलत नव्हता. ‘अरे, मी
तुला विचारतेय’
अ… ह… करत विजय काहीच बोलत नव्हता. वर्गातील साऱ्या मुलांचे लक्ष आता मॅडम व विजय यांच्या बोलण्याकडे लागले होते. तो काहीच बोलत नाही, यावर मॅडम चिडून म्हणाल्या, ‘जा! बस, आपल्या जागेवर.’
विद्यार्थ्यांचं हजेरी बुक बंद करत बाईंनी मुलांना निबंधाच्या वह्या काढण्याची सूचना केली. चला आज तुम्ही सर्वांनी ‘मी केलेले चांगले काम’ या विषयावर निबंध लिहा. सूचना मिळताच साऱ्या मुलांनी दप्तरातून वही, पेन बाहेर काढत तर काहीजण एकमेकांशी चर्चा करत, तर काहीजण डोक्याला हात लावून चांगले काम आठवण्याचा प्रयत्न
करू लागले.
मॅडमनी, वर्गातील मुलांवर नजर फिरवली. सगळेजण निबंध लिहिण्यात तल्लीन झाले होते. कारण विषयही तसाच होता. त्यामुळे कुठूनही शोधून पाहून लिहिण्याचा प्रश्नच नव्हता. इतक्यात तास संपण्याची बेल झाली. वर्गातील मॉनिटर अभिषेकला साऱ्या मुलांच्या वह्या एकत्र करून स्टाफरूममध्ये घेऊन येण्यास सांगून मॅडम दुसऱ्या वर्गात निघून गेल्या. मधली सुट्टी होताच अभिषेकने साऱ्या वह्या एकत्र करून स्टाफरूममध्ये बाईंच्या जवळ नेऊन ठेवल्या. मधल्या सुट्टीत सगळे शिक्षक स्टाफरूममध्ये आले. त्यातील एका शिक्षिकेने मॅडमना विचारले, ‘काय हो मॅडम, तुमच्या वर्गातील विजय सकाळी उशिरा येताना पाहिला.’
मॅडम म्हणाल्या, हो, तो आज उशिरा आला, मात्र तो काहीच बोलला नाही. आता मात्र स्टाफरूममध्ये ‘विजय’ हा विषय दहा मिनिटे छानच रंगला हो, ‘तो ना तसाच आहे, स्वत:ला अलीकडे फार
शहाणा समजतोय.’
ऑफ तास मिळताच मॅडमनी वह्या तपासण्यास घेतल्या. पहिली वही होती विजयची. विजयने लिहिलं होतं,
‘माझ्या हातून घडलेले चांगले काम’
मी आज सकाळी शाळेत निघालो. आईने मला बस तिकिटासाठी पंधरा रुपये दिले होते. शाळेत येत असताना रोडच्या बाजूला एक कचराकुंडी आहे. या कचराकुंडीतील बरेचसे अन्न इतस्ततः विखुरलेले होते. एक, दोन कुत्रे काही उंदीर, घुशी ते अन्न खात होते. मात्र मी जे पाहिले ते कधी न विसरता येणारे चित्र होते. पत्रावळीतील शिळे अन्न एक गरीब माणूस हाताने एकत्र करून खाताना मी पाहिला. थोडा वेळ ते दृश्य पाहत तिथेच उभा राहिलो, अन् मनात विचार करू लागलो, आपण तर घरी गरमगरम आईने केलेले जेवण जेवतो. न आवडणाऱ्या भाज्या ताटात टाकून देतो, तेच अन्न कचरा म्हणून या कचराकुंडीत येते. पण, अशी कितीतरी गरीब माणसं आहेत, ज्यांना अन्न मिळत नाही. या विचाराने मी बैचेन झालो. नकळत माझा हात खिशाकडे वळला, आईने दिलेले १५ रुपये मी त्या गरीब माणसाला दिले आणि म्हणालो, ‘हे घ्या आणि यातून काहीतरी विकत घेऊन खा.’ मी त्यांच्या हातावर पैसे ठेवताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. अश्रुपूर्ण नयनांनी त्याने वर केलेले दोन हात मला आशीर्वाद दिल्यासारखे भासले. परिस्थितीने गरीब असलेला तो माणूस मनाने मला श्रीमंत वाटला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात जतन करीत मी थेट चालत निघालो.
आज शनिवारचा दिवस होता. दररोजच्या प्रार्थना ठरलेल्या होत्या. आजची प्रार्थना होती.
देह मंदिर चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना…
प्रार्थना केव्हाच संपली होती. पण आज माझ्या हातून कृतीयुक्त प्रार्थना झाली होती. याचे मला समाधान वाटत होते. सकाळी बाई रागवल्या, खरे तर, मॅडम काय विचारत आहेत, या प्रश्नाकडे माझे लक्षच नव्हते. ‘माझ्या मनात केवळ विचार होते केवळ त्या गरीब व्यक्तीचे. मात्र आज मॅडमनी निबंध लिहायला सांगितला आणि विषय नेमका ताजा आणि डोक्यातील असल्यानेच डोक्यातले कागदात उतरले अन् मन
हलके झाले.’
म्हणून तर, संत तुकाराम महाराज म्हणत,
‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे
जो आपुले
तोची साधू ओळखावा, देव
तेथेची जाणावा’
मॅडमनी निबंध तपासला. स्टाफरूममध्ये तो निबंध सर्व शिक्षकांना वाचून दाखवला आणि थेट विजयच्या वर्गात आल्या. वर्गातील विद्यार्थ्यांनाही तो निबंध त्यांनी वाचून दाखवला आणि भरल्या आवाजात विजयला जवळ घेऊन प्रेमळपणे त्याच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हणाल्या, ‘विजय इतका सुंदर निबंध लिहिला आहेस की, तुझ्यामध्ये मला भावी लेखक, कवी दिसतोच, पण एक चांगला माणूसही दिसू लागलेला आहे.
मॅडम वर्गात सांगू लागल्या, ‘मुलांनो स्वतःइतकी इतरांची काळजी घेणारा चांगला सेवक बनू शकतो. इतरांच्या भावनांची, हृदयाची, मनाची, परिस्थितीची कल्पना या वयात मनात निर्माण होणं, हा फार मोठा संस्कार आहे संवेदनशीलतेचा.’
मुलांनो, विजयसारखेच आपण सर्व विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या आई-वडिलांच्या, नातेवाइकांच्या सहवासातून समाज-संपर्कातून घडत आहात. पुढे आपल्यामधूनही असेच विद्यार्थी घडतील व आपल्या सत्य-कृत्याचे वर्णन सुवर्णाक्षरांनी लिहिले जाऊन त्याची दखल जग घेईल हे मात्र निश्चित.