नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओला, उबेरसारख्या सर्विसेसने अधिक शुल्क आकारल्याच्या वारंवार तक्रारी येत होत्या. त्यानंतर कर्नाटक परिवहन मंडळाने अशा काही प्रमुख अॅप्सची बंगळुरूमधली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने अशाप्रकारे जास्त शुल्क आकारण्याला बेकायदेशीर म्हटले आहे. आणि त्यांना नोटीस बजावली आहे.
कर्नाटक सरकारने ओला, उबेर आणि रॅपिडो अशा सेवा पुरवणाऱ्या अॅप्सला तीनच दिवसांमध्ये आपली ऑटोसेवा बंद करण्यास सांगितले आहे. काही प्रवाशांनी कर्नाटक सरकारकडे याची तक्रार केली होती. ओला आणि उबेर दोन किलोमीटरपेक्षा कमी अंतर असले तरीही किमान १०० रुपये आकारतात. शहरातील ऑटोचे किमान भाडे पहिल्या २ किलोमीटरसाठी ३० रुपये आणि त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १५ रुपये निश्चित करण्यात आले आहे.
परिवहन आयुक्त टीएचएम कुमार यांच्या म्हणण्यानुसार, राज्याचे ऑन-डिमांड ट्रान्सपोर्टेशन टेक्नॉलॉजी एग्रीगेटर्स नियम या कंपन्यांना ऑटो-रिक्षा सेवा चालवण्याची परवानगी देत नाहीत कारण ती फक्त टॅक्सीपुरती मर्यादित होती. ‘सरकारी नियमांचे उल्लंघन करून हे ओला, उबेर ऑटोरिक्षा सेवा देत आहेत. तसेच, सरकारने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दर ग्राहकांकडून आकारले जात असल्याचे विभागाच्या निदर्शनास आले आहे, असे आयुक्तांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.