वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्व सामान्य गरीब विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
तालुक्यात शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा किती आहेत याची माहिती राज्य शासनाच्या सुचने प्रमाणे गटशिक्षण अधिकारी यांच्याकडून केंद्र प्रमुखांना सूचना करून सादर करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा लवकरच बंद होण्याचे संकेत आहेत. मात्र या निर्णयाला ग्रामीण भागातील पालक, शिक्षक व संघटना विरोध करीत आहेत. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा जर बंद झाल्या तर वाडी तांड्यातील ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या शिक्षणाचे नुकसान होईल.
शिक्षणाच्या प्रवाहापासून हे विद्यार्थी दूर जातील. शिवाय शाळाबाह्य मुलांच्या संख्येत भर पडेल. केवळ पटसंख्या कमी म्हणून हा निकष ग्रहीत धरून शाळा बंद करणे हा वंचित समूहातील मुलांवर अन्याय ठरेल, असे बोलले जात आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्यासंदर्भात कोणत्या स्तरावर काय कार्यवाही सुरु आहे. यासंदर्भातील अहवाल शासनाने मागवला असल्याने कमी पटाच्या शाळा बंद झाल्यावर पुढे काय होणार? या संदर्भात साशंकता व्यक्त होत आहे. तथापी या स्वरूपाच्या निर्णया विरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
सरकारच्या या धोरणामुळे सामान्य नागरिकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणली आहे. एकही मूळ शिक्षणा पासून वंचित राहणार नाही हे घटना सांगते.परंतु शासनाच्या या अशा धोरणामुळेच शिक्षण खाजगी करणाकडे चालले आहे.याचा सर्वात जास्त फटका डोंगर द-यात राहणा-या गोरगरीब आदिवासी बांधवांना बसणार आहे.त्यामुळे या निर्णयाला श्रमजिवी संघटना तीव्र विरोध करणार असून आम्ही हे होवुच देणार नाही. – विजय जाधव, सरचिटणीस श्रमजीवी संघटना
शाळा बंद करण्यासंदर्भात आमच्याकडे शासनाकडून अजुन तरी काहीही आलेले नाही. – भगवान मोकाशी, प्रभारी गटशिक्षण अधिकारी वाडा
संसदेत मंजूर केलेल्या शिक्षण हक्क कायद्या नुसार राहत्या घरा पासून एक किलोमीटरच्या अंतरावर १ली ते ५वीचे प्राथमिक शिक्षण व तीन किलोमीटरच्या आत ६वी ते ८वीचे उच्च प्राथमिक शिक्षण उपलब्ध पाहीजे. त्यामुळे २०पटाच्या आतील शाळा बंद केल्यास शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली होणार आहे.शिक्षक सेनेचा या शाळा बंद करण्यास तीव्र विरोध आहे. – मनेश पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षक सेना पालघर जिल्हा