नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील ९ महिन्यांमध्ये पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या ६ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये ५ मासेमारी करणारे होते. विशेष म्हणजे या सर्व ६ जणांनी शिक्षेचा कार्यकाळ पूर्ण केला होता. भारताने त्यांना माघारी आणण्यासाठी अपिल केले होते. तरीही पाकिस्तानने बेकायदेशीररित्या त्यांना ताब्यात ठेवले.
याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पुढे सांगितले की, ‘भारतीय कैद्यांचा पाकिस्तानात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कैद्यांच्या सुरक्षेचा मुद्दा इस्लामाबादमधील आमच्या कमिशनद्वारे नेहमी उपस्थित केलेला होता. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. त्यामुळे पाकिस्तान सरकारने त्यांच्या ताब्यात असलेल्या भारतीय कैद्यांना तातडीने सोडून भारतात पाठवून द्यावे.’’
कॅलिफोर्निया येथे एका भारतीय वंशाच्या कुटुंबाची हत्या झाली होती. त्यावर बोलतांना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, आमचा दूतावास त्या कुटुंबाच्या संपर्कात आहे. मर्सिड काऊंटी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करीत आहोत.