बीड : अंबाजोगाई तालुक्यातील चनई येथील ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ घनगाव यांचा दसऱ्याच्या दिवशीच भर रस्त्यात निर्घृण खून करण्यात आला. या हत्येप्रकरणी १७ जणांवर अॅट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली असून इतर ११ जणांचा शोध सुरु आहे.
गोरखनाथ घनगाव हे बुधवारी सकाळी रमेश कदम यांच्या स्वस्त धान्य दुकानात धान्य आणण्यासाठी गेले होते. यावेळी कदम तसेच त्यांची मुले सुरज आणि धीरज यांनी गोरखनाथ घनगाव यांना धक्काबुखी करत रेशन दुकानाच्या बाहेर काढले. तसेच त्यांना जातीवाचक शिवीगाळ केली. ग्रामपंचायत सदस्य असल्याने रेशनची तुम्हाला काय गरज असे म्हणून त्यांना रेशन देण्यास नकार दिला होता.
रेशन दुकानातून परत आलेले गोरखनाथ दुपारी आपल्या शेतात गेले असता इटकर नावाच्या एका व्यक्तीने रमेश कदम यांच्याशी झालेल्या भांडणावरुन गोरखनाथ यांना शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. त्यानंतर संध्याकाळच्या वेळी गोरखनाथ हे गावात परत आल्यानंतर रमेश कदम याने काही गुंडांना सोबत घेऊन त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि यामध्येच मनोज इटकर याने धारदार शस्त्राने गोरखनाथ यांच्यावर वार केले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. नवनाथ इटकर आणि धीरज कदम यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गोरखनाथ यांना अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गोरखनाथ घनगाव यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातलगांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलिसांनी आता गोरखनाथ यांच्या हत्येप्रकरणी १७ जणांवर ॲट्रॉसिटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यामध्ये सहा जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.