नाशिक : नाशिकमध्ये एका इडली विकणाऱ्याकडून पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तमिळनाडू येथील रहिवासी असलेल्या संशयित मलायारसन मदसमय (वय ३३, मूळ रा. ३९, ईस्टमार्ग कायथर, पण्णीकार, कुलूम, तुदूकुडी, तामिळनाडू ) यास पोलिसांनी भारतनगर येथून अटक केली आहे.
कालिका यात्रोत्सवात गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा चलनात आल्या होत्या. ही बाब मुंबई नाका पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले यांनी याप्रकरणी वेगाने तपास केला. यात त्यांना मलायारसन मदसमय याच्याकडे बनावट नोटा असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचत भारतनगर भागातून संशयित मलायारसन यास अटक केली. त्याच्याकडे कसुन तपासणी केली असता पोलिसांना तब्बल पाच लाख ८ हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा मिळून आल्या. यामध्ये त्याच्याकडे ५०० रुपये किमतीच्या ४० बनावट नोटा व दोन हजार रुपये किमतीच्या २४४ बनावट नोटा सापडल्या आहेत. या शिवाय त्याच्याकडून ३ हजार ३०० रुपये रोख रक्कम देखील सापडली आहे.