Thursday, April 24, 2025
Homeकोकणसिंधुदुर्गमालवणातील रॉक गार्डन बनतेय पर्यटकांचे खास आकर्षण

मालवणातील रॉक गार्डन बनतेय पर्यटकांचे खास आकर्षण

मालवण : पर्यटन राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवणातील पालिकेचे रॉक गार्डन हे काही वर्षांत राज्यभरातील पर्यटकांचे खास आकर्षण राहिले आहे. या गार्डनमध्ये विविध सोयीसुविधा पालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत; मात्र सुविधांबरोबरच पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी घोडेसफर, पर्यटकांबरोबरच कलाकारांना कला सादर करण्यासाठी व्यासपीठ यासह अन्य उपक्रम राबविणे गरजेचे बनले आहे. यातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होईल.

येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यासह तारकर्ली, देवबाग, वायरी, चिवला बीच, तोंडवळी, आचरा बंदरसह शहरातील रॉक गार्डन, जयगणेश मंदिर हे देश, विदेशातून तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरले आहे. किल्ले सिंधुदुर्गला भेट देण्याबरोबर सागरी पर्यटनाचा आनंद लुटणारे पर्यटक हे शहरातील पोलिस ठाण्यालगत असलेल्या रॉक गार्डनला भेट देतात. सुरुवातीच्या काळात पालिकेच्या या गार्डनमध्ये सुविधांची वानवा होती; मात्र मधल्या काळात बच्चे कंपनींसाठी विविध प्रकारची खेळणी, म्युझिकल फाउंटन यासारख्या सुविधा पालिकेने उपलब्ध करून दिल्या. पर्यटकांकडूनही या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रॉक गार्डनमध्ये विविध प्रकारची फुले, पदपथ साकारण्यात आला. त्यानंतर रात्रीच्यावेळीही पर्यटकांना रॉक गार्डन न्याहाळता यावे, यासाठी पदपथांवर आकर्षक विद्युतरोषणाईही करण्यात आली. पर्यटकांना आकर्षून घेण्यासाठी अत्यावश्यक सोयी-सुविधा पालिकेच्या माध्यमातून देण्यात आल्या. सुरुवातीस गार्डनला भेट देणाऱ्या पर्यटकांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नव्हते; मात्र मालवण पर्यटनाची नवी ओळख ‘रॉक गार्डन’मधल्या काळात गार्डनची देखभाल दुरूस्तीसह पालिकेच्या उत्पन्नात भर पडावी यादृष्टीने गार्डनला भेट देणार्या पर्यटकांकडून नाममात्र ५ रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

सेल्फी पॉईट बनतेय युवकांसाठी लक्षवेधी

कोरोना काळात सर्व पर्यटन ठप्प राहिल्याने गार्डन परिसरही सुनासुना बनला होता; मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर गार्डन पुन्हा पर्यटकांनी बहरल्याचे दिसून आले. याच दरम्यान पालिकेच्या माध्यमातून म्युझिकल फाउंटन हा प्रकल्प राबविण्यात आला. रात्रीच्यावेळी संगीतावर उडणारे रंगीत कारंजे हे पर्यटकांचे खास आकर्षण बनले. पावसाळ्याच्या काळात पर्यटन बंद असल्याने या काळात ते सुनेसुने बनते. यावर्षीचा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे हे रॉक गार्डन पुन्हा पर्यटकांनी गजबजून जाणार आहे. सद्यस्थितीत म्युझिकल फाउंटन बंद असून पर्यटकांच्या आगमनानंतर हे पर्यटकांच्या सेवेत रूजू होणार आहे. याबरोबरच गार्डनला भेट देण्यास येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षक असा सेल्फी पॉईंट उभारला आहे. सध्या हा सेल्फी पॉईंट आणखीन आकर्षक बनविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे या पर्यटन हंगामात हा सेल्फी पॉईंट पर्यटकांसाठी लक्षवेधी असेल यात शंका नाही.

रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याचा आशावाद

रॉकगार्डनच्या प्रवेशद्वारालगत दुतर्फा विविध व्यावसायिकांची दुकाने आहेत. रॉकगार्डनमुळे अनेक स्थानिकांना रोजगार मिळाला आहे; मात्र याठिकाणी झालेल्या अतिक्रमणामुळे रॉकगार्डन नेमके कुठे आहे हेच पर्यटकांना समजत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही दुकाने व्यवस्थित कशी लावली जातील. रॉकगार्डनकडे जाणाऱ्या पर्यटकांना कोणताही त्रास होता नये यादृष्टीने पालिकेने प्रयत्न करायला हवेत. गार्डनमध्ये बच्चे कंपनीसाठी विविध खेळाचे प्रकार, म्युझिकल फाउंटन यासारखे उपक्रम पालिकेने राबविले आहेत; मात्र या उपक्रमांबरोबरच रॉकगार्डनच्या लगतच्या बंधारा कम रस्त्यावर घोडेसफर यासह अन्य उपक्रम राबविले गेल्यास त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलच शिवाय पालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल.

कला सादरीकरणासाठी व्यासपिठाची गरज

गार्डनमध्ये येणाऱ्या पर्यटकांना किंवा स्थानिकांना आपल्यातील कला, कराओके गाणी, एकपात्री प्रयोग, कविता सादरीकरण यासह अन्य कलांचे सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांना आपली कला सादर करता येईल. शिवाय या माध्यमातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडेल. शहरातील विविध सांस्कृतिक संस्थांशी संपर्क साधून त्यांना यासाठी रॉकगार्डनमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांना एक वेगळी पर्वणी मिळेल. यादृष्टीने या पर्यटन हंगामात पालिकेने प्रयत्न करायला हवेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -