Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरवसई-विरार महापालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात सात बोलेरो लवकरच!

वसई-विरार महापालिका अग्निशमन विभागाच्या ताफ्यात सात बोलेरो लवकरच!

६५ लाखांचा खर्च अपेक्षित

विरार (प्रतिनिधी): अग्निशमन व आणीबाणी विभागातील सनियंत्रक, प्रभारी अग्निशमन केंद्र अधिकारी यांच्याकरता वसई-विरार महापालिकेने सात बोलेरो वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच ही वाहने अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त शंकर खांदारे यांनी दिली आहे. पालिकेने या वाहनांकरता ६५ लाख ५६ हजार ३९७ इतका खर्च अपेक्षित धरला आहे.

वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी सेवा विभागाची एकूण सात ठिकाणी अग्निशमन दले कार्यरत आहेत. या ठिकाणी २३२ अग्निशमन कर्मचारी चोवीस तास कार्यरत असतात. महापालिकेचे क्षेत्र अंदाजे ३८० चौ.कि.मी. एवढे विस्तीर्ण असून यात सागरी, नागरी व डोंगरी प्रभाग आहेत. शिवाय औद्योगिक वसाहती, नागरी वसाहती, गोदामे व दाटीवाटीच्या वस्तींचे प्रमाणही मोठे आहे. तसेच शासन निर्णयाप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रापासून २० किमीच्या परिसराची दखल देखील अग्निशमन घेत असते. बहुतांश वेळा आपत्तीप्रसंगी पालघर, बोईसर एआयडीसीपर्यंत महापालिकेचे अग्निशमन दल सेवा देते.

यासोबतच महापालिका हद्दीतील शहराचा विकास झपाट्याने होत असल्याने लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवघर (पूर्व), वालीव, गोखिवरे, गौराईपाडा, पेल्हार, कामण, विरार व पापडी या भागात मोठ्या औद्योगिक वसाहती आहेत. इतकी मोठी व्यापकता असलेल्या शहरासाठी महापालिका कार्यक्षेतील प्रभाग समितीनुसार अग्निशमन कर्मचाऱ्यांची नियंत्रक, प्रभारी अग्निशमन केंद्र अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या कर्मचाऱ्यांकडून प्रभाग समितीतील सार्वजनिक वापराच्या व लोकांची वर्दळ असणाऱ्या खासगी इमारती, रुग्णालये, सिनेमा हॉल, नाट्यगृहे, व्यावसायिक, वाणिज्य इमारती, संकुले, मॉल्स, हॉटेल, मोठी व्यावसायिक कार्यालये, सर्व प्रकारची गोदामे, उत्पादन, औद्योगिक कारखाने, पेट्रोल-सीएनजी पंप, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, उंच रहिवाशी इमारती इत्यादी आस्थापनांना नोटीस बजावण्यात येतात. तसेच या आस्थापनांकडून अग्निसुरक्षा परीक्षण करून घेण्यात येते. ही सर्व ठिकाणे महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांतर्गत येत असल्याने या सर्व ठिकाणी अग्निशमन सेवा बजावावी लागते.

मात्र वाहनाअभावी या आस्थापनांची प्रत्यक्ष पाहणी करणे, वाटप केलेल्या नोटिसींचा आढावा घेता येत नसल्याचे अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेच्या अग्निशमन व आणीबाणी विभागाने सात बोलेरो वाहनांची आवश्यकता व्यक्त केलेली होती. त्यानुसार ही वाहने घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

दरम्यान, विभागीय कार्यालयास उपरोक्त उपअग्निशमन केंद्र या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाची पाहणी करणे, प्राप्त होणाऱ्या तक्रार अर्जानुसार प्रत्यक्ष जागेची पाहणी करणे, महापालिकेच्या हद्दीत विविध ठिकाणी दुर्घटना तसेच अपघात होतात तेव्हा अशा आपत्कालिन परिस्थितीत कार्यालयीन कर्मचारी यांची ने-आण करणे तसेच बंदोबस्ताची पाहणी करण्याकरता ही वाहने उपयोगात येणार असल्याची माहिती वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी दिलीप पालव यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -