ठाणे (प्रतिनिधी) : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला वेळोवेळी पूर आलेला असून पुराच्या पाण्यासोबतच जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा जमा झालेला आहे. हा गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने पंपाद्वारे होणारा पाण्याचा प्रवाह (फ्लो) कमी झालेला आहे. सदरचा गाळ काढण्यासाठी बुधवार २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत शटडाऊन घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून या कालावधीत स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.
बुधवार सप्टेंबर २२ रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत १२ तासांसाठी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहिल. तसेच इंदिरानगरकडे जाणाऱ्या १९६८च्या मुख्य गुरुत्व जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनसाठी इंदिरानगरवरील इंदिरानगर, रामनगर, श्रीनगर, लोकमान्य नगर, रुपादेवी, येऊर, डिफेन्स, विठ्ठल क्रिडा मंडळ, किसननगर इ. भागात पाणीपुरवठा २१ रोजी सकाळी ९ ते गुरुवारी सकाळी ९.०० वाजेपर्यंत २४ तास पूर्णपणे बंद राहिल. वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.