उजणी (वार्ताहर) : सिन्नर ता. पुर्व भागातील मौजे उजणी व परिसरामध्ये ढगफुटी सद्रृश्य पावसाने हाहाकार माजवला. उजणी परिसरातील गावाशेजारील पाझर तलाव हा एक महिन्यापूर्वीच तुडुंब भरून सांडवा निघालेला असतांना अतिवृष्टी झाली. यामुळे पाझर तलाव शेजारी असलेले शेतकरी मच्छिंद्र भिमाजी लोहार (शिरसाठ) यांचे गट क्र. १४७ मध्ये १२ हजार कोंबड्याचे पोल्ट्री शेडमध्ये अचानक पाणी शिरले. या संपूर्ण कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत.
४५ दिवसांपूर्वीच लोहार यांनी पक्षी ४८ रूपये प्रतीपक्षी प्रमाणे व खाद्य विकत घेऊन त्यांचे चांगले संगोपन केले होते. एक-दोन दिवसात कोंबड्यांची विक्री होणार होती.
लोहार यांचे संबंधित कंपनीसोबत दरही ठरलेला होता. अतिवृष्टीने लोहार यांचे सुमारे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे. तसेच लोहार यांच्या पोल्ट्री शेड शेजारील गट क्र. १४७ मध्ये तीन एकर टोमॅटो प्लॉटही जलमय झाला आहे. या नुकसानीचा पंचनामा करून मला शासकीय मदत मिळावी, अशी अपेक्षा लोहार कुटुंबानी व्यक्त केली.
पावसामुळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अचानक आलेल्या पाण्याचे प्रवाहाने अतोनात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कामगार तलाठी यांनी दोनच दिवस दिले होते. अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे होणे अजूनही बाकी आहे. तरी महसूल विभागाने त्वरीत सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करूण पंचनामे करावे व शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.