अहमदनगर : सैराट सिनेमातील प्रिन्स ही भूमिका साकारणारा सूरज पवार याला शिर्डीतील एका व्यक्तिला मंत्रालयात नोकरीचे आमिष देऊन फसवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
या प्रकरणात इतरांचीही नावे सामिल आहेत. मात्र सूरजने नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचा आरोप सध्या त्याच्यावर आहे. नेवासा तालुक्यातील महेश वाघडकर यांना मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दोन जणांनी दिलं होते. यासाठी ५ लाखांची मागणीही त्याच्याकडून करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला २ लाख अशी त्यांची बोलणी झाली होती. पैशांचे पाकीट देण्यासाठी राहुरी इथे महेश गेले तेव्हा त्यांना आपली फसवणुक होत असल्याची चाहूल लागली. यानंतर त्यांनी अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात केली.
या सर्व प्रकरणात मोठे रॅकेट असल्याची माहिती समोर येत आहे. आरोपींची चौकशी केल्यानंतर सिनेमातील गाजलेल्या कलाकारही यात सामिल असल्याचे राहुरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.