वामनराव ऊर्फ दादासाहेब देसाई ठाणे, मुंबई येथे राहात असत. त्यांच्याकडे सुद्धा बाबा अधून मधून जात असत, तेथे मुक्कामाला पण राहात असत. राऊळ महाराज यांनी दादासाहेब देसाईंना बरोबर घेऊन गरूडेश्वर, गाणगापूर, पिंगुळी, परूळे, आदिनारायण इत्यादी तिर्थस्थानांना भेटी दिलेल्या आहेत.
अशा प्रकारे महाराज व दादासाहेब खूप फिरलेले आहेत. असेच एके दिवशी बाबा दादासाहेबांच्या घरी मुक्कामाला होते. एक दिवस काय लहर लागली कुणास ठाऊक. बाबा म्हणाले, ‘कुडाळला जाऊया!’ बाबांच्या आज्ञेनुसार दादासाहेबांचा ड्रायव्हर मोतीराम याने गाडी बाहेर काढली. महाराज, दादासाहेब गाडीत बसले.
गाडी चालू झाली. ते ठाण्यावरून निघाले ते पावशी येथे थांबले. गाडी थांबल्याबरोबर महाराज जोरात ओरडले ‘अरे गाडी का उभी केलीस, गाडी चालू करा!’ परंतु मोती ड्रायव्हरने सांगितले की, नदीला फार मोठा पूर आला आहे; परंतु महाराजांनी तशीच गाडी पुढे नेण्यास सांगितले. मग ड्रायव्हर तरी चिंता कशाला करील? त्याने गाडी भरधाव सोडली. गाडी पाण्यात अर्धी बुडाली होती. पण सुखरूपपणे कुडाळला पोहोचली. त्यानंतर तेथे थांबलेल्या सर्व गाड्या त्या पाण्यातून कुडाळला आल्या.
समर्थ राऊळ महाराज