Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरविक्रमगड तालुक्यात दळणवळणाची समस्या गंभीर; ४० टक्के गावांना अजूनही बससेवेची प्रतिक्षा

विक्रमगड तालुक्यात दळणवळणाची समस्या गंभीर; ४० टक्के गावांना अजूनही बससेवेची प्रतिक्षा

विक्रमगड (वार्ताहर) : विक्रमगड तालुक्याची निर्मिती होऊन तब्बल २३ वर्षे उलटली तरी तालुक्यातील ४० टक्के गावात बस जात नसल्याने तालुक्यातील दळण-वळणाचा प्रश्न समोर आला आहे. येथील ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून तसेच जव्हार, वाडा, डहाणू, पालघर या डेपोतून येणाऱ्या बसमधून दाटी-वाटीने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे विक्रमगड तालुक्यासाठी स्वतंत्र बस आगार सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

विक्रमगड तालुका हा ९५% आदिवासी डोंगराळ विभागात गणला जातो. तालुक्यातील लोकसंख्या २ लाखांच्या वरती पोहोचली आहे. पण ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘एसटी’ची सुविधा तालुक्यातील तब्बल ४० टक्के गावात पोहोचली नाही. यामुळे येथील ग्रामस्थांसह, नोकरदार, विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातून, तसेच जव्हार, वाडा, डहाणू, पालघर या बस डेपोतून येणाऱ्या बसमधून दाटी-वाटीने प्रवास करावा लागत आहे. त्यातच जव्हार, वाडा, पालघर, डहाणू या बस डेपोंतून येणाऱ्या बसची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे प्रवाशांना एक ते दोन तास ताटकळत उभे राहावे लागते. अन्यथा खाजगी वाहनातून जादा पैसे देऊन गर्दीतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने येथे बस डेपो सुरू करण्याची मागणी केली आहे.

विक्रमगड शहरात असणाऱ्या बस स्थानकात सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यातच या तालुक्यात येणाऱ्या-जाणाऱ्या बस कधीही वेळापत्रकाप्रमाणे धावत नाहीत. विक्रमगड शहर तालुक्याचे ठिकाण असल्याने येथून डहाणू, पालघर, जव्हार येथे जाता येत असल्याने या शहरात लोकांची व वाहनांची नेहमीच वर्दळ असते. येथील बस स्थानक छोटाशा जागेत असल्याने हे अपुरे पडत आहे; तर तालुक्यात ज्या गावात बसची सुविधा आहे अशा अनेक गावांत मात्र प्रवाशांना बसण्यासाठी प्रवासी शेड नसल्याने प्रवाशांना बसची वाट बघत भर उन्हात ताटकळत थांबावे लागत आहे. ग्रामीण भागात ४० टक्के गावांतील रस्त्यांवर बस जात नसल्याने विद्यार्थी, वृद्ध, व्यापारी, रुग्ण, शेतकरी, शेतमजूर यांना खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यासाठी स्वतंत्र बस डेपो असावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.

जादा दराने शेतमालाची वाहतूक

तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फुलांची पिके, नर्सरी व इतर पिके घेत आहेत. त्यामुळे येथून उत्पादित होणारा शेतमाल शेतकऱ्यांना खाजगी वाहनातून नाशिक, मुंबई, दादर येथे जास्तीचे भाडे देऊन पाठवावा लागत आहेत. तालुक्यात बस डेपो सुरू केल्यास येथील शेतकऱ्यांना येथे उत्पादित होणारा माल कमी खर्चात बाजारपेठेत पाठवता येईल, असे येथील शेकऱ्यांनी सांगितले.

विक्रमगड तालुक्यातील बस आगाराचा प्रश्न गंभीर आहे. मात्र वाहतुकीची कुठलीही सुविधा अनेक गावांत नसल्याने येथील विद्यार्थ्यांना तीन ते चार किमी पायी प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने विक्रमगड तालुक्यासाठी स्वतंत्र बस आगाराची सोय करावी. – स्वप्नील पाटील, प्रवासी, विक्रमगड

तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फुलांसह इतर पिके घेत आहेत. त्यामुळे येथून उत्पादित होणारा शेतमाल शेतकरी खाजगी वाहनातून पाठवत आहेत. पण बस डेपो सुरू झाल्यास शेतकऱ्यांना शेतमाल कमी खर्चात बाजारपेठेत पाठवता येईल. – सचिन ठाकरे, शेतकरी, विक्रमगड

विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांत आजही बस जात नाहीत. यामुळे तालुक्यातील सर्व पक्षांतील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले तरच विक्रमगडसाठी बस आगाराचे स्वप्न साकार होईल. – सिद्धार्थ सांबरे, सामाजिक कार्यकर्ता, विक्रमगड

विक्रमगड तालुक्यात बस आगारासाठी मागणी केली आहे. जागा मिळाल्यावर त्याचा अहवाल तयार करून कार्यवाही करण्यात येईल. नाशिक व पालघरमधील बसेसना सोयीस्कर होईल अशी जागा मिळाल्यास फायदा होणार आहे. जागेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. – आशीष चौधरी, वाहतूक अधिकारी, पालघर विभाग, राज्य परिवहन महामंडळ

विक्रमगड येथे यशवंत नगर भागात तहसील विभागातून बस आगाराला जागा दाखविण्यात आली. मात्र लेखी काहीच नसल्याने पुढील प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे जर जागा मिळाली तर तालुक्यात प्रवाशांसाठी बस आगाराची व्यवस्था होणार आहे, याकरिता पालघर बस आगार सकारात्मक पावले उचलत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -