मुंबई : अपघातांना आळा घालण्यासाठी आता कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांना देखील सीट बेल्ट लावणे बंधनकारक असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या घोषणेनंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ‘कारमध्ये सीट बेल्ट लावा आणि रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणाऱ्या ठेकेदार व अधिका-यांना रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करा,’ असे ट्वीट करत गडकरींना टोला लगावला आहे. हे ट्वीट करताना त्यांनी #आता_सहन_नाही_होत असा हॅशटॅग वापरला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने जसं सीटबेल्ट बांधणं अनिवार्य केलं आहे तसंच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय ! @nitingadkari #आता_सहन_नाही_होत.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 7, 2022
आमदार राजू पाटील यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये लिहीले आहे की, “सुरक्षेच्या दृष्टीने जसे सीटबेल्ट बांधणे अनिवार्य केले आहे, तसेच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभे करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय!” महत्त्वाचे म्हणजे, राजू पाटील यांनी हे ट्वीट केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरींना टॅग केले आहे.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर अपघातात मृत्यू झाला. या नंतर सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.