Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरवसई-विरारमध्ये ३५० रिक्षाचालकांवर कारवाई

वसई-विरारमध्ये ३५० रिक्षाचालकांवर कारवाई

मनमानी भाडेवाढीला चाप, पोलिसांचे कौतुक

विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार शहरातील रिक्षाचालकांच्या मनमानी भाडेवाढीला चाप लावण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने तीव्र कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत ३५० रिक्षाचालकांविरोधात कारवाई करण्यात आली असून प्रवाशांनी २०२१च्या निर्धारित दरपत्रकाप्रमाणेच रिक्षाचालकांना भाडे द्यावे, असे आवाहन विरार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी केले आहे.

वसई-विरार शहरात २२१ मार्गावर शेअर भाडे दर निश्चित करण्यात आलेला आहे. मात्र हे दरपत्रक झुगारून शहरातील रिक्षा चालक व संघटनांनी परस्पर भाडेवाढ केली आहे. वाढती महागाई, इंधनाचे वाढलेले भाव, कोविड-१९ काळात असलेले प्रतिबंध व नादुरुस्त रस्ते अशी अनेक कारणे या दरवाढीमागे रिक्षाचालक व संघटनांनी सांगितलेली आहेत. मात्र या सगळ्याची झळ प्रवाशांनाही बसलेली आहे. त्यात रिक्षाचालक वसूल करत असलेले भाडे वाजवीपेक्षा जास्त असल्याने प्रवासी व रिक्षाचालकांत खटके उडत आहेत. कोविड-१९चे प्रतिबंध शिथिल झाल्यानंतरही वसई-विरार शहरातील रिक्षाचालकांनी वाढवलेले दर कमी केलेले नाहीत. कोविड काळात दोन प्रवासी व प्रति प्रवासी २० रुपये भाडे अशी अट घालण्यात आलेली होती. निर्बंध शिथील झाल्यानंतर रिक्षाचालक कधी चार; तर कधी पाच प्रवासी बसवत असतानाही प्रति प्रवासी २० रुपये भाडे कायम आहे. प्रत्यक्षात उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दरपत्रकानुसार हे भाडे दीड किलोमीटरकरिता ९ रुपये इतके आहे. त्यामुळे रिक्षाचालकांच्या मनमानीविरोधात वसई-विरारकरांनी संताप व्यक्त होत आहे.

प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींमुळे स्थानिक राजकीय पक्षांनी परिवहन विभागाने जाहीर केलेले दरपत्रक प्रसिद्ध केले होते. त्याविरोधात रिक्षा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र प्रवाशांचा वाढता रोष व रिक्षाचालकांची वाढती मनमानी यामुळे वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागानेही या दरपत्रकाच्या अंमलबजावणीकरता रिक्षाचालकांविरोधात कार्यवाही सुरू केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान; रिक्षा संघटनांच्या आगामी रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव एमएमआर समितीकडे पाठवण्यात आला आहे. तूर्त २०२१ च्याच दरपत्रकाप्रमाणे भाडे दर घ्यावेत, अशी तंबी रिक्षाचालकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वाघुले यांनी दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -