Sunday, March 16, 2025
Homeमहत्वाची बातमीगणपती आरास करण्यासाठी शोभिवंत झाडांची मागणी

गणपती आरास करण्यासाठी शोभिवंत झाडांची मागणी

रोपवाटिका सजल्या, इको-फ्रेंडलीकडे वाढता कल

सुधागड-पाली (वार्ताहर) : पर्यावरण स्नेही व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत. त्यामुळेच सजावटीसाठी आता थर्माकोल, प्लास्टिक आदी साहित्याव्यतिरिक्त नैसर्गिक व विघटनशील अशा साधनांचा वापर केला जात आहे. त्यामध्ये शोभिवंत झाडे, फुलझाडे आणि कुंड्यांना विशेष मागणी आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी रोपवाटिका सजल्या आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबरच या झाडांमुळे सुंदरता व आकर्षकपणादेखील येतो. शिवाय ही झाडे नंतर परसबागेची शोभादेखील वाढवितात.

पेण येथील सुहास पाटील यांनी प्रहारला सांगितले की, गेली अनेक वर्षे इकोफ्रेंडली आरास बनवितो. त्यामध्ये आकर्षक फुले व शोभिवंत झाडांचा वापर करतो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनदेखील होते. शिवाय ही फुले किमान ५ दिवस टवटवीत राहतात. सध्या अनेक नर्सरी चालकांनी अशा स्वरूपाची शोभिवंत व फुलझाडे आणि विविध आकाराच्या व रंगाच्या कुंड्यादेखील आपल्या नर्सरीमध्ये विकण्यास ठेवल्या आहेत. तसेच गणेशोत्सवासाठी विशेष सूट व आकर्षक योजनादेखील दिल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक कापडी, कागदी व पुठ्ठ्याच्या मखरांबरोबरच आता शोभिवंत फूल व झाडेदेखील पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी योगदान देत आहेत.

पर्यावरणाचे भान राखून कोणतेही सण व उत्सव साजरे केले पाहिजेत. त्यामुळेच नर्सरीत माफक दरात शोभिवंत झाडे व फुलझाडे तसेच कुंड्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. याबरोबरच या सर्वांची मांडणी व रचना कशी करावी याची माहिती व कल्पना मोफत देत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास थोडा हातभारदेखील लागत आहे. – अमित निंबाळकर, मालक, ग्रीनटच नर्सरी, पाली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -