मुंबई (प्रतिनिधी) : सध्या मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालिकेने मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेत मुंबईतील घरांतून ५० हजार डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात आली आहेत. पालिकेच्या कीटकनाशक खात्याने मोहिमेदरम्यान ८२ लाख उत्पत्ती स्थाने तपासली असून त्यातील घरांमधून साधारणत: ५० हजार उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यात आली आहेत.
दरम्यान मुंबई महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने पावसाळ्यापूर्वीच डेंग्यू, मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. १ जानेवारी ते २३ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबवलेल्या मोहिमेत कीटकनाशक विभागाने डासांची लाखो उत्पत्तीस्थाने नष्ट केली आहेत. दरम्यान मलेरियाच्या एनोफिलीस डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव इत्यादी एकूण ३,२५,९२६ उत्पत्तीस्थाने तपासली आहेत. या मोहिमेत एनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळलेली उत्पत्तीस्थाने ७,७२७ इतकी आहेत.
विशेष म्हणजे डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका उपाययोजना करत आहे. यासाठी पालिकेकडून घरातील पाण्याची पिंप, टायर, ऑड आर्टिकल, फेंगशुई झाडे, मनी प्लांट तपासले जात आहेत. आतापर्यंत ८२,६८,७२४ उत्पत्तीस्थाने तपासण्यात आली आहेत. त्यात एडिस डासांची ४९,९१७ उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. तसेच डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या ८,४३७ जणांना नोटिसा बजावलेल्या आहेत, तर ५९४ जणांविरोधात न्यायालयात दावे दाखल केले असून यात ९ लाख २२ हजार ८०० रुपयांची रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात आली आहे.
रस्त्यांवरील ‘कर्व स्टफ’ बनले डासांची उत्पत्तीस्थाने
पालिकेने रस्त्यांवर लावलेले फायबरचे ‘कर्व स्टफ’ सध्या डासांची उत्पत्ती स्थाने बनले आहेत. मुंबईतील रस्ते आणि पदपथांच्या बाजूला फायबरचे ‘कर्व स्टफ’ लावण्यात आले आहेत. पालिकेच्या रस्ते व वाहतूक नियोजन विभागाकडून हे ‘कर्व स्टफ’ बसवण्यात आल्याचे समजते. मात्र बऱ्याच ठिकाणचे ‘कर्व स्टफ’ फुटले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी आणि कचरा मोठ्या प्रमाणावर साचला आहे. आठवडाभर पावसाने उघडीप दिल्याने त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या तयार झाल्या आहेत, तर पालिकेच्या कीटकनाशक खात्याने फुटलेल्या ‘कर्व स्टफ’ची पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ते काढून टाकण्याचेही निर्देश दिले आहेत.