पुणे : दिल्ली आणि उत्तरप्रदेशात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असलेल्या जुनैद मोहम्मद आणि त्याच्या साथीदारांचा कट महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने आज उघडकीला आणला आहे. नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिझवी या तीन लोकांवर हल्ला करण्याची योजना पु्ण्यातून अटक करण्यात आलेले संशयीत दहशतवादी आखत होते. अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. तसेच भाजपच्या रॅलीवर हल्ल्याचाही त्यांचा प्लॅन होता अशी माहितीही खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे.
या हल्ल्यांसाठी त्यांना स्फोटके तयार करण्यासाठी लागणारी साधने आणि पैसे हे थेट पाकिस्तानातील मास्टरमाईंडकडून येणार होते. जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते. काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे या आधी झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद मोहम्मद याला पुण्यातील दापोडी भागातून २४ मे रोजी ताब्यात घेण्यात आले होते.