विरार (प्रतिनिधी) : थकित वीजबिल वेळेत भरा, अन्यथा तुमचे वीज कनेक्शन कापले जाईल, असा मॅसेज ब-याचशा वीज ग्राहकांना आल्यानंतर ग्राहकांची झोप उडाली आहे. याबाबत ग्राहकांनी मुख्य वीज अभियंत्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर क्रमांकावरून आलेला मॅसेज व सदर क्रमांकच फ्रॉड असल्याचे सांगितले आहे. अफवा पसरवणा-या बनावट वीज मॅसेजवर कोणत्याही ग्राहकाने विश्वास ठेवू नये, असे आवाहन वीज वितरण महामंडळाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, सध्या वसईतील ग्राहकांना त्यांच्या व्हॉटसअॅपवर मॅसेज येत असून थकीत वीजबिल त्वरित भरा; अन्यथा रात्री ९.३० वाजता वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. मोबाईलवर आलेला मॅसेज हा इंग्रजीमध्ये असून या मॅसेजबाबत ग्राहकांनी वीज वितरण महामंडळाकडे चौकशी केली असता त्यांनी हा मॅसेज बनावट असल्याचे म्हटले आहे.
ज्या क्रमांकावरून मॅसेज आला त्या क्रमांकाबाबत वीज वितरण महामंडळाने पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. अशा बनावट मॅसेजवर वीज ग्राहकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन वीज वितरण महामंडळाच्या मुख्य अभियंत्यांनी केले आहे.