विरार (प्रतिनिधी) : मान्सून काळात वसईतील अभयारण्य, धबधबे, धरण व तलाव परिसरात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या जीविताची काळजी घेण्याच्या अनुषंगाने येथील पर्यटन स्थळांच्या एक किलोमीटर परिसरात पोलिसांनी पुन्हा प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार वसई पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सुरुची बाग, रानगाव बीच, ब्रह्म पाडा व भुईगाव बीच; तर वालीव पोलीस ठाणे अंतर्गत चिंचोटी धबधबा, देवकुंडी कामण व राजवली खदान परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय परिमंडळ-२ वसई कार्यक्षेत्रातील अभयारण्य, धबधबे, समुद्रकिनारे आणि तलावांवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी मुंबई, पालघर, रायगड व ठाणे येथून अनेक पर्यटक येत असतात. मात्र या ठिकाणी जाण्यासाठीच्या वाटा अरुंद असल्याने पर्यटकांच्या जीविताची व वित्तहानीची शक्यता असते. याशिवाय पर्यटनस्थळी टिंगळटवाळीसारख्या घटना घडत असतात. काही वेळा महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडतात. मद्यपान पर्यटक करून पाण्यात उतरत असल्याने जीविताला धोका उदभवतो.
सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपणे वाहने चालवून वाहतुकीला पर्यायाने अन्य पर्यटकांची कोंडी केली जाते. पर्यटनाच्या नावाखाली वायू, ध्वनी, जल प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे वसई-विरार, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय परिमंडळ-२ वसई कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अभयारण्य, धबधबे, समुद्रकिनारे आणि तलाव परिसरात हे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश २० ऑगस्टपासून ३ सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहेत.
या आधी १४ ते २८ जुलै या कालावधीत माणिकपूर, तुळींज, वालीव व आचोळे पोलीस ठाण्याअंतर्गतही अशा प्रकारचे आदेश लागू करण्यात आले होते. दरम्यान; या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे.