विरार (प्रतिनिधी) : यंदा जुलै महिन्यात तुफान पाऊस पडल्यानंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी मोठ्या क्षमतेची धरणे भरली. मात्र नालासोपारा पूर्वेतील आचोळे येथील तलाव केवळ २ ते ३ फूटच भरले असल्याने यंदा गणेश विसर्जनावर विघ्न असल्याचे सावट निर्माण झाले आहे. आचोळे तलाव क्षेत्रात मोठा पाऊस झाल्यास तलाव काठोकाठ भरून गणेश मूर्त्यांच्या विसर्जनासाठी पोषक स्थिती निर्माण होईल, असे येथील गणेश भक्तांचे म्हणणे आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. मात्र नालासोपारा पूर्वेतील आचोळे तलाव आटलेल्या स्थितीत आहे. सद्यस्थितीत तलावाची खोली पाण्याने केवळ २ ते ३ फूट इतकीच भरलेली दिसून येते. इतक्या कमी पाण्यात गणेश मूर्त्यांचे विसर्जन करणे कठीण आहे.
यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवावरील सर्व निर्बंध मागे घेतल्याने आपसुकच मूर्त्यांच्या उंच्या वाढणार आहेत. त्यामुळे कमी खोलीत मूर्त्यांचे विसर्जन करता येणार नाही. त्यासाठी आचोळे तलावातील पाण्याची पातळी वाढणे गरजेचे आहे. सद्यस्थितील आचोळे तलावाला मोठ्या पावसाची गरज आहे. या परिसरात मोठा पाऊस झाल्यास आचोळे तलावाची उंची वाढण्यास मदत होईल. तसेच गणेश विसर्जनाचा प्रश्नही मार्गी लागेल.