Monday, April 28, 2025
Homeकोकणरत्नागिरीवाशिष्ठी माई रक्षण कर; चिपळूणवासीयांची आर्त विनवणी

वाशिष्ठी माई रक्षण कर; चिपळूणवासीयांची आर्त विनवणी

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूणकरांच्या नशिबी २२ जुलै २०२१ सारखा भयंकर दिवस पुन्हा येऊ दे नको, वाशिष्ठी माई आमचं रक्षण कर, अशी आर्त विनवणी करीत चिपळूण बचाव समितीसह शहरवासीयांनी वाशिष्ठी नदीचे पूजन केले. चिपळूणला पूरमुक्त करण्याचे साकडे घालतानाच त्यांनी या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली.

२२ जुलैला चिपळूणच्या महापुराला एक वर्ष पूर्ण झाले. गतवर्षी याच दिवशी वाशिष्ठी आणि शिव नद्यांनी रौद्ररूप धारण करत चिपळूण शहरासह आसपासच्या गावात हाहाकार उडवला होता. या नद्यांचे पाणी थेट शहरात घुसले आणि जीवितहानीसह करोडोंचे नुकसान झाले. या दिवसाच्या कटू आठवणी आजही प्रत्येक चिपळूणकरांच्या स्मरणात ताज्या आहेत. चिपळूण बचाव समिती आणि समस्त चिपळूणवासीयांनी एकजूट दाखवत शासन दरबारी आपल्या वेदनांचे हुंदके उपोषणाच्या माध्यमातून पोहोचविले. तब्बल २९ दिवस चाललेल्या या आंदोलनाला यश आले आणि जलसंपदा विभागाने वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे काम प्रकर्षाने हाती घेतले. सामाजिक दायित्वातून नाम फाऊंडेशनही पुढे आले. शिवनदीला गाळमुक्त करून त्यांनी चिपळूणवासीयांना दिलासा दिला. शासन, प्रशासन आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून वाशिष्ठी आणि शिव नदीतून सुमारे साडेसात लाख घनमीटर गाळ काढला गेला. यामुळे जुलै महिन्यात तीनवेळा अतिवृष्टी झाली, तरीही या नद्यांना साधा पूरही आला नाही. गाळ उपशाची प्रक्रिया चिपळूणकरांसाठी जमेची बाजू ठरली. पावसाळा अजून शिल्लक आहे.

नागरिक आणि व्यापारी वर्गात महापुराची भीती आहे. त्यामुळे यापुढेही वाशिष्ठी नदीचे पाणी शहरात घुसू नये यासाठी समस्त चिपळूवासीयांच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहरातील गांधारेश्वर येथे जाऊन वाशिष्ठी नदीची ओटी भरून पूजन करण्यात आले. यावेळी लता भोजने, आदिती देशपांडे, भक्ती कदम, स्वाती भोजने, रसिका देवळेकर, धनश्री जोशी, गौरी कासेकर, चिपळूण बचाव समितीचे अरुण भोजने, बापू काणे, सतीश कदम, किशोर रेडीज, महेंद्र कासेकर, उदय ओतारी, दादा खातू व नागरिक उपस्थित होते.

महापुराला नद्यांमध्ये साचलेला गाळ हे सुद्धा एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे शासनाने सर्वप्रथम तो गाळ काढावा, या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने चिपळूणवासीयांच्या सहभागाने लढा उभारला. या आंदोलनाची सुरूवातही वाशिष्ठी नदीचे पूजन करून करण्यात आली होती. – सतीश कदम, चिपळूण बचाव समिती

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -