प्रशांत जोशी
डोंबिवली : स्मार्टफोनवर ऑनलाईन जुगाराचा सुळसुळाट होताना दिसून येतो. बाजारात टपऱ्या आणि दुकानांमध्ये अशा चालणाऱ्या ऑनलाईन जुगाराच्या अड्ड्यांवर अनेकजण आकर्षित होत आहेत. या प्रकारात नोकरदार, व्यावसायिकांचा समावेश आहेच, पण आता शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा भरणा अधिक आहे. सायबर पोलिसांना ही बाब लक्षात आली आहे. तक्रारीसुद्धा त्यांच्यापर्यंत गेल्या आहेत. पण कायद्याने बंदी नसल्याने अनेक भागांत ऑनलाईन जुगाराचे अड्डे आहेत. तरुणाईची यामध्ये जवळीक होत आहे. यामुळे अशा जुगारावर बंदी घालण्याची मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या डोंबिवली विधानसभा क्षेत्र कमिटीचे कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकरणी कार्याध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी पोलिसांचे लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधले आहे. या संदर्भात पाटील यांनी ऑनलाईन मटका/जुगार अड्डे चालविणाऱ्या काही माफियांची नावेही या निवेदनात नमूद केली आहेत. डोंबिवलीत ठिकठिकाणी ऑनलाईन मटका/जुगाराचे अड्डे आहेत. शहरातील चौकाचौकांतील दुकानांतून सुरू असलेल्या या अड्ड्यांवर लोकांची दररोज लाखो रुपयांची फसवणूक होत आहे.
अशा अड्ड्यांचे जाळे स्टेशन परिसरात, तसेच सर्वसामान्यांची लोकवस्ती असलेल्या भागात थाटले गेले आहेत. या जुगारात महाविद्यालयीनच नव्हे तर शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गुरफटत चालले असून देशाचे उज्ज्वल भवितव्य उद्ध्वस्त होताना दिसत आहे, असेही पाटील सांगतात.