देवा पेरवी
पेण : पेण लगतच्या ग्रामीण परिसरात सध्या वैविध्यपूर्ण रानभाज्यांचा जणूकाही महोत्सव सुरू झाल्याचे भासत आहे. जंगलातील रानभाज्या घेण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे. पेण लगतच्या बळवली, दुरशेत, विरानी, कोटबी, कासमाल, बोरगाव, वरसई, शेने आदी गावांतील रानमेवा प्रसिद्ध आहे. निसर्ग संपदेने बहरलेल्या विविध आयुर्वेदिक जडीबुटी, रानमेवा व रानभाज्यांनी पेण मार्केटमध्ये पावसाळ्यात रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते.
पहिल्या पावसाच्या आगमनानंतर लगेच जुलै महिन्यात रानभाज्या यायला सुरुवात होते. या काळामध्ये पेण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या गरीब आदिवासी लोकांच्या हाताला कामे नसल्याने अशा वेळी घरातील किराणा सामान व इतर धान्य संपण्याच्या मार्गावर असते. अशा वेळी आदिवासींना निसर्गाची साथ मिळते. आणि त्यांचा उदरनिर्वाह पावसाळ्याचे चार महीने चालतो.
करटुले, भारंग, आकुर, शेवळ यांना मागणी
जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यापासून ऑगस्टपर्यंत रानभाज्यांची रेलचेल असते. करटुले, भारंग, आकुर, शेवळ, टाकळा, कुरुदू, रानमाठ, तेरी, काटा, दिंडा, आम्बाडी, घोळू आदी रानभाज्या मोठ्या प्रमाणात येतात. रानभाज्या पोषक आहेत. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. या मोसमात तरोटा, करटुले आदी भाज्या खाल्ल्याने शरीराला जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे पेणच्या ग्रामीण भागातील रानभाज्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करतात.
रान भाज्या शरिराला पौष्टिक
पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या पौष्टिक असतात. ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. या भाज्या उकडून शिजवल्या जातात. करटुलेसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्त्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात.