विरार (प्रतिनिधी) : वसई तालुक्यातील धोकादायक पर्यटनस्थळांवर होणारे अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण अधिक असून याठिकाणी पर्यटनासाठी येण्यास पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश काढले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे हे आदेश कागदावरच राहिले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसईतील धोकादायक पर्यटनस्थळांवर विकेण्डला पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पर्यटनबंदी असतानादेखील पर्यटक जीव धोक्यात घालून पर्यटनस्थळांवर येत असल्याने धोका वाढला आहे. पोलीस आणि वन विभागाने लागू केलेल्या या पर्यटनबंदीतही पर्यटकांनी फुललेल्या मळ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे संतापजनक चित्र दिसून येत आहे.
वसई तालुक्यात तुंगारेश्वर व चिंचोटी या तुंगारेश्वर अभयारण्यातील धबधब्यांवर दरवर्षी मुंबई, ठाणे, पालघर, वसईतून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. दरवर्षी वरील दोन्ही धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत. कोरोना काळात वरील दोन्ही धबधब्यांवर सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घालण्यात आली होती. मात्र तरीही पर्यटक बंदी झुगारून देऊन पर्यटक सदर ठिकाणी यायचे. तेव्हाही पोलीस आणि वन विभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यटकांचा बळी गेला होता.
आता पावसाळ्यात पुन्हा जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसाळ यांनी पर्यटनबंदीचे आदेश काढले आहेत. मात्र सदरचे आदेश झुगारून देत पर्यटक धोकादायक धबधब्यांवर येतच आहेत. वन विभागाचे कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांची सुरक्षा पुन्हा एकदा रामभरोसे उरली आहे. पोलीस व वन विभागाचे कर्मचारी धोकादायक पर्यटनस्थळांवर बंदोबस्त ठेवत नसल्याने विकेण्डला या धोकादायक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढत आहे. त्यामुले एखादी दुर्घटना घडल्यानंतरच या वन आणि पोलीस प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल सुज्ञ नागरिकांनी केला आहे.