Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीमुंबई-अहमदाबाद हायवेवर दरड कोसळली

मुंबई-अहमदाबाद हायवेवर दरड कोसळली

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ढेकाळेजवळ दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून दरड हटवण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. एमएमआरडीएच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम झाल्यानंतर खोदलेल्या टेकडीला कोणतीही संरक्षक भिंत तयार न केल्याने ही दरड कोसळल्याची माहिती पुढे आली आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसापासून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. यामुळे आज पहाटे पालघर तालुक्यातील सोमटा येथील परशुराम हाडळ यांचे घर कोसळले. घरासह घरातील सामग्रीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वसईच्या राजवली वाघरल पाडा या परिसरात दरड कोसळली आहे. या दरडीखाली 6 जण अडकले होते. त्यापैकी 4 जणांची सुटका करण्यात आली आहे. तर बाप-लेक असे दोघेजण अजूनही दरडीखालीच दबलेले असल्याची माहिती मिळते आहे. वालीव पोलीस आणि वसई विरार महापालिका अग्निशमन दलाचे जवान दुर्घटनास्थळी दाखल झालेत आणि बचावकार्य सुरु आहे. भारतीय हवामान विभाग आणि प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार 12 आणि 14 जुलै दरम्यान पालघर जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यभर पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांच्या आणि धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पालघर, पुणे शहर, गडचिरोली या ठिकाणी पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये ‘एनडीआरएफ’च्या 13 आणि ‘एसडीआरएफ’ची दोन पथके तैनात आहेत. तसेच गेल्या 12 दिवसांत अतिवृष्टीमुळे राज्यात 84 नागरिकांचा तर 180 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -