कणकवली : “स्वत: दहावी दोनदा नापास… आणि हा मुख्यमंत्र्यांवर टीका करतो” असे म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना खोचक टोला लगावला आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उठावानंतर उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंतांकडून सातत्याने बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला जात आहे. यातच विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदेंना स्वत:च्या हाताने ट्वीट तरी करता येते का? अशी विचारणा त्यांनी केली होती. याला आता भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.
तो खासदार विन्या राऊत कोण किती शिकलं आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते हा सांगतोय, हा स्वतः दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 7, 2022
“खासदार विनायक राऊत कोण किती शिकले आणि कोणाला ट्वीट करता येत नाही ते सांगतोय. हा स्वत: दहावी दोनदा नापास… जवळपास शिवसेनेच्या बारा वर्षाच्या सत्तेत याला एकदाही साधा राज्यमंत्री केला नाही आणि हा मुख्यमंत्री झालेल्या व्यक्तींवर टीका करतो” असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावे लागेल. कुणीतरी लिहून द्यायचे आणि ट्वीट करायचे. स्वत:च्या हाताने ट्वीट करता येते का? याचा अभ्यास करावा लागेल, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंना एकटे पाडण्याचा कुटील डाव ४० अलिबाबा चोरांच्या माध्यमातून भाजपा खेळत असेल, तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे.