मुंबई : तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे आणि पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने आज (८ जुलै) पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणा-या पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणा-या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत दिनांक २७ जून २०२२ रोजी १ लाख ३१ हजार ७७० दशलक्ष लिटर म्हणजे ९.१० टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. आज ३ लाख ७५ हजार ५१४ दशलक्ष लिटर म्हणजे २५.९४ टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.
मात्र, आता तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने महानगरपालिकेतर्फे लागू करण्यात आलेली १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी, नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.