इम्फाळ (हिं.स.) : मुसळधार पावसामुळे मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस महासंचालक पी. डोंगेल यांनी दिली. तसेच सुमारे ४० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहे. इम्फाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. परंतु, याच ठिकाणी बुधवारी रात्री भूस्खलन झाले. खराब हवामान आणि वारंवार भूस्खलन होत असल्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत. परंतु, ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या जवानांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. भूस्खलनामुळे स्थानिक इलजाई नदीच्या प्रवाहावरही परिणाम झाला आहे.
भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, बांधकामाधीन मणिपूर-जिरिबाम रेल्वे मार्गाचे रक्षण करण्यासाठी १०७ टेरिटोरियल आर्मीच्या तुकड्या तैनात होत्या. २९ जूनच्या रात्री नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्थानकाजवळ जोरदार भूस्खलनाचा फटका बसला. भूस्खलनाच्या घटनेनंतर मणिपूर पोलीस, भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले. यात लष्कराचा एक कॅम्प मातीच्या ढिगाऱ्याखाली दबला गेल्याचे सांगितले जात असून, आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मातीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर १९ जणांना वाचवण्यात यश आले असून, गंभीर जखमींना नोनी आर्मी मेडिकल युनिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहे. सध्या घटनास्थळी मदत व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी तुपुल रेल्वे स्थानकाजवळ भूस्खलन घटनेनंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली आहे.