Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीसशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी 'अग्निपथ' योजना

सशस्त्र दलांमध्ये तरुणांच्या भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना

नवी दिल्ली (हिं.स) : भारतीय तरुणांना सशस्त्र दलात सेवा करण्यासाठी दाखल होता यावे यासाठी अग्निपथ या आकर्षक भरती योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत निवडलेले युवक अग्निवीर म्हणून ओळखले जातील. देशभक्तीने प्रेरित या युवकांना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र दलात सामील व्हायची परवानगी या योजनेनुसार मिळणार आहे.

सशस्त्र दलांना अधिक सक्षम करण्यासाठी अग्निपथ योजनेची रचना करण्यात आली आहे. समकालीन तंत्रज्ञानाशी अधिक सुसंगत असलेल्या समाजातील तरुण प्रतिभांना आकर्षित करून कुशल, शिस्तबद्ध आणि प्रेरित मनुष्यबळ पुन्हा समाजात परत आणणारी ही योजना आहे. सैनिकांचा गणवेश परिधान करण्यास उत्सुक असलेल्या तरुणांना या योजनेद्वारे संधी मिळेल. सशस्त्र दलांतील तरुणांच्या संख्येत वाढ होऊन या दलांमध्ये नव्याने ‘जोश’ आणि ‘जज्बा’ तयार होईल त्याच वेळी अधिक तंत्रज्ञान जाणणाऱ्या युवकांच्या भरतीमुळे सशस्त्र दलांत काळानुरूप परिवर्तनशील बदल घडेल.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय सशस्त्र दलांचे सरासरी वय अंदाजे ४-५ वर्षांनी कमी होईल. स्वयं-शिस्त, परिश्रम आणि लक्ष्य याची सखोल समज असलेल्या प्रेरित तरुणांना, जे पुरेसे कुशलही आहेत आणि इतर क्षेत्रात योगदान देण्यास सक्षम आहेत अशा तरुणांच्या सशस्त्र दलातील अंतर्भावाचा फायदा राष्ट्रीय स्तरावर होईल.

देशाला, समाजाला आणि देशातील तरुणांना या अल्प कालावधीच्या लष्करी सेवेचा मोठा लाभ होणार आहे. यामध्ये देशभक्ती, सांघिक कार्य, शारीरिक तंदुरुस्ती वाढवणे, देशाप्रती दृढ निष्ठा वाढवण्यावर भर आहे. बाह्य धोके, अंतर्गत धोके आणि नैसर्गिक आपत्तींच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी प्रशिक्षित कर्मचार्यांसची उपलब्धता या योजनेद्वारे साध्य होईल. लष्कराच्या तीन सेवांच्या मनुष्यबळ विकास धोरणात नवीन युग सुरू करण्यासाठी सरकारने सादर केलेली ही प्रमुख संरक्षण धोरण सुधारणा आहे. हे धोरण, तात्काळ लागू होईल. त्यानंतर तीन सेवांसाठी नावनोंदणी नियंत्रित करेल.

अग्निवीरांना लाभ

अग्निवीरांना तिन्ही सेवांमध्ये लागू असलेल्या जोखीम आणि खडतर मेहनत भत्त्यांसह आकर्षक कस्टमाइज्ड मासिक पॅकेज दिले जाईल. चार वर्षांचा प्रतिबद्धता कालावधी पूर्ण झाल्यावर, अग्निवीरांना एकवेळचे ‘सेवानिधी’ पॅकेज दिले जाईल. ‘सेवानिधी’ला प्राप्तिकरातून सूट मिळेल. ग्रॅच्युइटी आणि सेवानिवृत्ती फायद्यांचा कोणताही हक्क असणार नाही. अग्निवीरांना भारतीय सशस्त्र दलातील त्यांच्या व्यस्त कालावधीसाठी ४८ लाख रुपयांचे विना-सहयोगी जीवन विमा संरक्षण प्रदान केले जाईल.

राष्ट्रसेवेच्या या कालावधीत अग्निवीरांना विविध लष्करी कौशल्ये आणि अनुभव, शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण, धैर्य आणि देशभक्तीचे प्रशिक्षण दिले जाईल. चार वर्षांच्या या कार्यकाळानंतर, अग्निवीरांना नागरी समाजात समाविष्ट केले जाईल जिथे ते राष्ट्र उभारणी प्रक्रियेत ते मोठे योगदान देऊ शकतील. प्रत्येक अग्निवीराने मिळवलेले कौशल्य त्याच्या अनोख्या बायोडेटाचा भाग बनवण्यासाठी प्रमाणपत्रात समाविष्ट केले जाईल.

अग्निवीरांनी त्यांच्या तारुण्याचा चार वर्षांचा कार्यकाळ सेवेत पूर्ण केल्यावर, ते प्रौढ आणि स्वयंशिस्तबद्ध होतील. ते व्यावसायिक पातळीवर आणि वैयक्तिकरित्या अधिक चांगले नागरिक बनतील. अग्निवीर पुन्हा नागरी जगात आल्यानंतर त्यांच्या प्रगतीसाठी जे मार्ग उपलब्ध होतील आणि ज्या संधी मिळतील त्याचा फायदा राष्ट्र उभारणीसाठी होईल. समाजाच्या आर्थिकदृष्ट्या वंचित स्तरातील तरुणांवर आर्थिक दबाव असतो. अशा वंचित अग्निवीराला आर्थिक दबावाशिवाय भविष्यातील स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास अंदाजे रु. ११.७१ लाखांचा सेवा निधी मदत करेल.

नियमित केडर म्हणून सशस्त्र दलांमध्ये नावनोंदणीसाठी निवडलेल्या व्यक्तींना पुढील किमान १५ वर्षांच्या कार्यकाळासाठी सेवा देणे आवश्यक आहे आणि ते भारतीय सैन्यातील कनिष्ठ आयोग अधिकारी/इतर पदांच्या विद्यमान अटी व शर्तींनुसार नियंत्रित केले जातील. वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार भारतीय नौदल आणि भारतीय हवाईदलामधील त्यांचे समतुल्य आणि भारतीय वायुसेनेमध्ये नावनोंदणी केलेले नॉन कॉम्बॅटंट असतील. या योजनेमुळे सशस्त्र दलातील तरुण आणि अनुभवी कर्मचारी यांच्यात सुदृढ संतुलन राखलं जाईल. त्यामुळे अधिक तरुण आणि तांत्रिकदृष्ट्या निपुण लढाऊ दल निर्माण होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -