डोंबिवली : मुगुंस दिसल्यास दिवस शुभ जातो. धनप्राप्ती होते अशी अंधश्रध्दा आहे. याच अंधश्रद्धेतून डोंबिवलीकराने चक्क घरात पिंजरा ठेऊन त्यात चार मुंगूस पाळल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात वन खात्याला माहिती मिळताच वनविभगाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पिंजऱ्यातून चार मुंगुसांची सुटका करत मुंगूस पाळणाऱ्या विठ्ठल जोशी यांच्या विरोधात कारवाई केली.
आजपर्यंत कासव शुभ असल्याचा समज असल्याने अनेकांनी घरात कासव पाळल्याचे अनेकदा ऐकले असेल. स्टार प्रजातीचे कासव पाळणे गुन्हा असून अनेकदा यावर कारवाई देखील करण्यात आली आहे. मुंगूस हा शुभ प्राणी मानला जातो. त्यामुळे काही अंधश्रद्धाळू नियम व कायदा धाब्यावर बसवून मुंगूस पाळून आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.
पश्चिम डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर अर्थात जुनी डोंबिवली परिसरात गणेश स्मृती इमारतीमध्ये विठ्ठल जोशी हे आपल्या कुटुंबासह राहतात. मुंगूसचा चेहरा रोज सकाळी पाहिल्यावर दिवस चांगला जातो. तसेच धनप्राप्ती देखिल होते असा विठ्ठल जोशी यांचा समज होता. या भोळ्या समजूतीतून विठ्ठल यांनी चक्क मुंगूस पाळण्याचा निर्णय घेतला. एका जंगलातून चार मुंगूस पकडून आणून त्यांनी आपल्या घरात ठेवले.
हे चारही मुंगूस पिंज-यात ठेवण्यात आले होते. याची खबर कल्याण वनविभागाच्या पथकाला माहिती मिळाली. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कायद्यांतर्गत मुंगूस पाळणे हा गुन्हा आहे. वनविभागाच्या पथकाने तत्काळ विठ्ठल जोशी यांच्या घरी छापा टाकून पिंजऱ्यात बंदिस्त असलेले हे चार मुंगूस ताब्यात घेतले. या प्रकरणी वन विभागाने विठ्ठल जोशी यांच्या विरोधात कारवाई केली आहे. कायद्याने बंदी असलेले वन्यजीवांपैकी पशू-पक्षी पाळू नये असे आवाहन वन अधिकारी एम. डी. जाधव यांनी केले आहे.