नवी दिल्ली (हिं.स.) : नॅशनल हेरॉल्ड खरेदी व्यवहारातील मनी लाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कसून चौकशी केली. राहुल यांची ३ तास चौकशी केल्यानंतर दुपारी अडच वाजता त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली.
राहुल गांधी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. यावेळी तब्बल ३ तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दुपारी राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर आले. यावेळी त्यांनी रुग्णालयात जाऊन सोनियां गांधींची भेट घेतली. त्यानंतर काही वेळाने ते दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले. दरम्यान सकाळी राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचण्यापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यानंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांना घेतले. राहुल यांच्या चौकशीच्या विरोधात सोमवारी देशभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले. दिल्लीमध्ये प्रियंका गांधी यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या नेत्यांची भेटही घेतली.
राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले तेव्हा पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सोबत होत्या. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीतच राहुल गांधी ईडी कार्यालयात पोहोचले होते. ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तिसऱ्या बॅरिकेडजवळ रोखलं. यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी पुढे गेले असता नेते तिथेच बसून राहिले. काही वेळाने पोलिसांनी काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि बसमधून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. प्रियंका गांधी या नेत्यांची भेट घेण्यासाठी तुघलक रोड पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या.
नेमके प्रकरण काय आहे….?
स्वातंत्र्यपूर्व काळात जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल आणि काँग्रेसच्या इतर नेत्यांनी असोसिएट जर्नल्स नावाची कंपनीची स्थापना करून हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत तीन वर्तमानपत्रे सुरू केली होती. त्यापैकी नॅशनल हेरॉल्ड हे इंग्रजी दैनिक होते. स्वातंत्र्योत्तर काळात हे वृत्तपत्र बंद पडले. त्यानंतर २०१२ मध्ये सोनिया आणि राहुल गांधींच्या ‘यंग इंडिया’ या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरू करण्यात आले नव्हते. हे हक्क घेताना १६०० कोटींची संपत्ती फक्त ५० लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरू आहे. नॅशनल हेराल्डमध्ये यंग इंडिया, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा प्रत्येकी ३८ टक्के हिस्सा आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक आहेत. पटियाला हाऊस न्यायालयाने राहुल आणि सोनिया यांना फसवणूक आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. यंग इंडियाने फक्त ५० लाख रुपयांच्या बदल्यात असोसिएट जर्नल्सचे मालकी हक्क मिळवल्याचा आरोप सोनिया आणि राहुल यांच्यावर करण्यात आला होता.
सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप आहे की, गांधी कुटुंब हेराल्डच्या मालमत्तांचा बेकायदेशीरपणे वापर करत आहे. ज्यात दिल्लीतील हेराल्ड हाऊस आणि इतर मालमत्ता आहेत. या आरोपांबाबत ते २०१२ मध्ये न्यायालयात गेले होते. प्रदीर्घ सुनावणीनंतर २६ जून २०१४ रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावले. तेव्हापासून या आदेशाची अंमलबजावणी प्रलंबित आहे. तसेच सोनिया आणि राहुल याप्रकरणी जामीनावर आहेत.