पुणे (हिं.स.) : पुण्यातील भवानी पेठ परिसरात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास स्फोट झाला. विशाल सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये हा स्फोट झाला होता. स्फोटाच्या आवाजामुळे फ्लॅटच्या खिडक्या देखील फुटल्या. या स्फोटामुळे परिसरात खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणी रशाद मोहम्मद अली शेख नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अधिकची चौकशी सुरू आहे.
समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले की, विशाल सोसायटीत रशाद शेख हा आरोपी आपल्या वॉशिंग मशीनची दुरुस्ती करत होता. त्यावेळी फायर गॅस टॉर्चचा अतिरिक्त फ्लो सोडला गेल्याने हा स्फोट झाला अशी शक्यता आहे.
रशादकडे चौकशी केल्यानंतर तो कोंढवा परिसरामध्ये आपल्या नातेवाईकांसोबत लिशा इनकलेव या सोसायटीमध्ये राहत असल्याचे कळल्यानंतर पुणे पोलीस तिथेही पोहोचले आणि आणि त्यांनी त्याच्या नातेवाईकांची देखील चौकशी केली. त्याच्या अटकेनंतर खरंच इलेक्ट्रिकल वस्तू दुरुस्त करून तो स्वतःचा उदरनिर्वाह करत असेल का? त्याच्या फ्लॅटमध्ये घडलेला स्फोट कशाचा होता?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान ज्या फ्लॅटमध्ये स्फोट झाला तेथून काही सिमकार्ड, पाकिस्तानी पुस्तकांसह संशयास्पद वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
रशाद हा मुळचा मुंबईतील आहे. तो इलेक्ट्रिक इंजिनिअर आहे. तो गेल्या १० वर्षांपासून या सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष मुस्ताक अहमद यांनी दिली.