अनुराधा परब
कोकणच्या इतिहासाचा अभ्यास करताना तिथल्या लयनस्थापत्याचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. कोकणातील लयनस्थापत्याचा प्रारंभ काळ हा साधारणपणे इसवी सन पूर्व पहिले ते इसवी सनाचे पहिले शतक सांगितला जातो. लेण्यांमध्ये बौद्ध, जैन आणि हिंदू असे तीन वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील बहुतांश लेणी बौद्ध धर्मीयांची आहेत. लेण्यांचा अभ्यास करताना आतापर्यंत असे लक्षात आले आहे की, सर्वच्या सर्व लेणी ही डोंगरांच्या शिखरावर किंवा शिखरानजीक नसतात, तर ती डोंगराच्या मध्यावर किंवा मध्यापासून किंचित वरच्या बाजूस असतात. त्यामागचे तर्कशास्त्र असे की, लेणींमध्ये निवास करणाऱ्या भिक्खू, साधू संन्याशांना किंवा मूनींना ध्यानधारणेसाठी पुरेसा विजनवास मिळावा. निरव शांतता मिळावी. त्याचबरोबर समाजाशी पुरेसे मर्यादित अंतर राखत एकरूपही होता येईल. मूनी, भिक्खू किंवा साधूसंन्याशांचे जगणे हे सर्वार्थाने भिक्षेवरती अवलंबून असल्याने त्यांना लेण्यांतून खाली भिक्षेसाठी जाऊन परतही येणे सहज शक्य व्हावे इतक्या उंचीवर लेणी कोरलेली आढळतात. बकासुराचा वाडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या लेणीला हे तर्कशास्त्र नेमके लागू होते. हे लेणे डोंगराच्या मध्याच्या किंचित वरती आहे.
महाभारतामध्ये भीम आणि बकासुराची कथा बऱ्याचजणांनी बालपणी आजी-आजोबांकडून नक्कीच ऐकलेली असेल. त्याच कथेचे प्रादेशिक रूप सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील ऐनारी येथील लेणीच्या आनुषंगाने प्रचलित असलेले दिसते. गाडाभर अन्न आणि एक माणूस एका वेळेत जेवणारा बकासूर हा राक्षस गोष्टीतच नाही, तर कल्पनेतही धडकी भरवणारा वाटतो. सह्याद्रीतील घनदाट जंगल आणि अशा स्वरूपाची कथा हा संयोग भीती निर्माण करण्यास पुरेसा पोषक ठरतो. राक्षस म्हटला की, त्याचा अवाढव्य देह, अक्राळविक्राळ रूपच समोर येते, तेही परंपरेने चालत आलेल्या वर्णनाबरहुकूम. तो खरंच तसा दिसत होता का?, यासारखे प्रश्न कायमच अनुत्तरित तरीही कुतूहलाला खतपाणी घालणारेच राहतात. महाभारतातील भीम आणि बकासूर यांच्यातील द्वंद्वाचा प्रसंग या ऐनारीमध्ये घडल्याची दृढ समजूत रूढ आहे. याच ऐनारी गावात एक गुहा असून त्याच्या पायथ्याजवळ राकसवाडा आणि तिथून पुढे काही अंतरावर ब्राह्मणाची राई लागते. या दोन्ही नावांवरून सहजच या कथेतील प्रसंगपूरक ठिकाणे, व्यक्तींचा अंदाज यावा. महाभारतातील या कथेनुसार ब्राह्मण कुटुंबातील मुलाला बकासुराकडे गाडाभर अन्नासोबत पाठविण्याची वेळ जेव्हा येते त्यावेळी कर्मधर्मसंयोगाने भीम त्याच अरण्यात असतो. त्याच्या कानावर ब्राह्मण कुटुंबाच्या रडण्याचा आवाज जातो आणि त्या विलापाचे कारण समजल्यानंतर भीम त्या ब्राह्मण मुलाच्या ऐवजी स्वतः बकासुराकडे जाण्यास निघतो. त्यानंतर भीम आणि बकासरामध्ये द्वंद्व होऊन त्यात बकासूर मरतो, अशी संपूर्ण कथा आहे. इथे असलेली गुहा ही बकासुराची गुहा म्हणून ओळखली जाते. कथेची सत्यता पटविणारा कोणताही सबळ पुरावा आढळत नसला तरीही लोककथेतून आलेला एक श्रद्धाभाव या ठिकाणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
तसं पाहायला गेलं, तर ही कथा म्हणजे मानवी मनातील भीतीवर शक्तीने, चातुर्याने केलेली मात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कदाचित याच हेतूने ऐनारी गावामध्ये या घटनेची आठवण म्हणून दर वर्षी पिठाचे बाहुले करून बकासुराच्या नावाने तोडले जाण्याची परंपरा पूर्वजांनी आखून दिलेली आहे. आजच्या काळात प्रतिकात्मक बैलगाडा तयार करून त्यावर भाताच्या लहानशा गोण्या, शिजवलेला भात लादून जंगलातील प्राणी-पक्ष्यांनी धान्यरूपाने खावा म्हणून राकसवाड्यात टाकण्याची पर्यावरणस्नेही परंपरा इथल्या ग्रामस्थांनी सुरू केली आहे. ब्राह्मणाच्या राईत पूजाविधी होऊन भीमाच्या शक्तीचा जयजयकार करत चांगली शेती होण्यासाठी तसेच संकटे टळावीत याकरिता प्रार्थना केली जाते. लोकपरंपरा अशा प्रकारे भीतीचे उन्नयन भक्तीमध्ये करताना आपल्याला दिसत राहते.
बकासुराची गुहा साधारणपणे १५०० मीटर उंचीवर असून तिथे खोदकाम करण्यात आलेले आहे. ज्या लेणींच्या कोरक्यांविषयी किंवा कोणी कोरवून-खोदून घेतली त्याविषयी माहिती नसेल, त्यावेळी सर्रासपणे ही पांडवकालीन लेणी किंवा मंदिर आहे, असे म्हणण्याचा एक प्रघातच पडून गेला आहे. तो इथेही ऐकायला मिळतो. लेणीला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर असे लक्षात येते की, या परिसरामध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते. सध्या तर घाटमाथ्यावरच सर्वाधिक पाऊस होतो. त्यामुळे इथे आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. या आर्द्रतेमुळे लेणीमधील अनेक बाबींचा ऱ्हास झालेला दिसतो. त्यामुळे लेणींची ओळख पटविण्यात अनेक अडचणी येतात.
ऐनारीच्या लेणीसारखीच अन्य लेणी सिंधुदुर्गामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्गातील लेणींवर अद्याप फारसे संशोधन झालेले नाही. ही लेणीही बौद्धच असावीत, असा संशोधकांचा कयास आहे. सध्या मुंबई आणि सिंधुदुर्गातील प्रत्येकी दोन संशोधक त्यावर अधिक काम करत आहेत. बहुतांश लेणींची निर्मिती व्यापारी मार्गावर असल्याचे आजवरच्या अभ्यासांती समोर आलेले आहे. त्यानुसार ऐनारी लेणींनाही हा तर्क नेमका लागू होतो. कारण ही लेणी सिंधुदुर्गाच्या किनाऱ्यावरून थेट कोल्हापूरच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर घाटमाथ्यानजीक आहेत. त्यामुळे लयनस्थापत्याचा व्यापारी मार्गांशी असलेला घनिष्ट संबंध इथे स्पष्ट होतो. काही दिवसांपूर्वी ‘पोसायडनचे ऐकायला हवे’ या भागात आपण हे पाहिले की, सिंधुदुर्गाच्या किनाऱ्याहून कोल्हापूरला येणाऱ्या मार्गानेच पोसायडन इथे पोहोचला. ऐनारी लेणे हे याच सर्वात कमी लांबीच्या व्यापारी मार्गावर वसलेले आहे. त्याअर्थी पाहिले जाता ऐनारी लेणीला हे तर्कशास्त्र नेमके लागू होते.