श्रीनिवास बेलसरे
पावसाळा म्हणजे सृष्टीच्या नूतनीकरणाचा आगळा ऋतू! अंगात पिसे भरल्यागत येणारे बेफाट वादळ जुने सगळे उचलून कुठल्या कुठे घेऊन जात असते. पावसाच्या पहिल्या सरींनी सगळे प्रवाही करून टाकलेले असते. नव्याच्या स्वागतासाठी निसर्ग जुन्याला घाईघाईत निरोप देत असतो! सृष्टीतील अनेक प्राणी, पक्षी, कीटक यांना तर बायबलच्या ‘उत्पत्ती’ या भागात परमेश्वराने दिला तसा संदेश ‘वरूनच’ आलेला असतो – “फळा फुला, वृद्धिंगत व्हा, अवघे विश्व व्यापून टाका.”
एका अंत:प्रेरणेनेच मग अनेक प्रजातीतील नर अनेक क्लृप्त्या करून मादीचे प्रियाराधन करू लागतो. अवघ्या अस्तित्वात नवनिर्मितीसाठी आवश्यक असलेल्या मीलनाची ओढ ओसंडून वाहत असते. मग माणूसच त्यापासून कसा वेगळा राहील? एक अनामिक हुरहूर, ओढ प्रत्येक तरुण मनात जागी होते, मनस्वी बनवते, आगळ्या मुग्ध मन:स्थितीत नेते. अगणित प्रेमकथांची सुरुवात याच ऋतूत तर होत असते!
अनेकदा रूढी, लौकिकाच्या जाणिवेतून आलेला संकोच, सगळे सगळे त्या बेधुंद जाणिवेच्या भोवऱ्यात वाहून जाते आणि निसर्गाच्या किमयेने एक अनावर मीलन कसे होऊन गेले ते दोघांनाही कळत नाही. अशाच अत्यंत तरल, अमूर्त, भावना नेमक्या शब्दांत पकडणारे भावगीत लिहिले होते कविवर्य पद्मश्री मंगेश पाडगावकर यांनी! या दिवसात अरुण दातेंच्या आवाजात ते गाणे नुसते ऐकले तरी कुणीही नॉस्टॅल्जिक मूडमध्ये जाऊ शकतो.
शब्दांवर जबरदस्त पकड असलेल्या या मनस्वी कवीची रचनाच अतिशय ओघवती! तारुण्यातील एका बेधुंद प्रसंगाचे वर्णन करताना कवी नजरबंदी करून आपल्याला एका अनामिक प्रदेशात घेऊन जातो. मग ती घडलेली किंवा घडावीशी वाटूनही राहून गेलेली भेट नुसत्या कल्पनेनेच तुम्हाला अस्वस्थ करते. त्यात यशवंत देवांचे संगीत म्हणजे यमुनाकाठच्या
गोपींना संमोहित करणारी बासरी!
भेट तुझी माझी स्मरते अजुन त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची…
पाडगावकर एखाद्या सिद्धहस्त नैपथ्यकारासारखे ‘त्या भेटीसाठी’ अनुरूप वातावरण कसे तयार करतात पाहा. ‘त्या’ दिसाची म्हणजे तो दिवस फक्त दोघांनाच माहीत आहे! त्यात ‘धुंद वादळ’ आणि वर पाऊस! पण नुसता पाऊस नाही – अख्खी ‘रात्रच पावसाची’! चिंब भिजवणाऱ्या मीलनाची जाणीव तीव्र करणारी रचना! शब्दांची इतकी अर्थवाही, नेमकी आणि तरीही संक्षिप्त निवड हाच कवी करू जाणे.
जे हवे, जसे हवे, तसेच ते रचून कविवर्य त्या वादळी भेटीचा सेट मनाच्या विशाल पडद्यावर उभा करतात –
कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा,
आंधळ्या तमातून वाहे आंधळाच वारा,
तुला मुळी नव्हती बाधा भीतीच्या विषाची…
जाणिवेचे दिवे विझलेले, मनाचे ‘नभ भावनेच्या मेघांनी आक्रमिलेले’, दिशा दाखवणारा एकही तारा दिसत नाही. अनियंत्रित भावनेच्या तांडवात ‘आंधळा अंधार’ आणि त्यातून वाहणारा अदृश्य वारा… अरेरे! कसले हे वर्णन!! कुणाच्या विवेकाचे तारू सुरक्षित राहील असल्या या वादळात? मग भीतीची बाधा तर दूरच, भीतीची नुसती चाहूलही लागत नसते.
मीलनावेगाच्या या अलौकिक भावनेपुढे अवघे लौकिक क्षुद्र वाटू लागते. बस! आता फक्त एक होणे – मन, शरीर, आत्म्याने – एक होणे इतकेच अस्तित्वाचे उद्दिष्ट उरते! अशा वेळी कोणताच प्रमाद ‘साहस’ वाटत नसतो! प्रीतीने नाव गाव टाकून म्हणजे स्वत:ला अगदी नगण्य करून घेतलेले असते. तिला ओढ असते ती फक्त मिलनाची, एकरूप होऊन, त्याच्यात विरून जाण्याची!
क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारून नीती,
नाव गाव टाकून आली अशी तुझी प्रीती,
तुला मुळी जाणीव नव्हती तुझ्या साहसाची…
या मीलनात येणारा शृंगार इतका स्वाभाविक आहे की, कसलाच काही हिशोब नाही. नकळतच जवळीक घडते. पावसाने भिजलेले ओलेचिंब केस आणि त्यातून टपकणारे मोत्यासारखे थेंब. मग हे मोती जिथून ओघळतात त्या गालांचे चुंबन ही तर त्यांची अपरिहार्य परिणीती! त्या थेंबाचे आयुष्य एकाच्या गालावरून दुसऱ्याच्या ओठापर्यंत पोहोचण्याइतके क्षणभंगुर!
श्वासांना प्रथमच लय सापडली आहे असे वाटते आणि एक प्रेमगाथा विश्वाच्या अमूर्त पटलावर अदृश्यपणे लिहिली जाऊ लागते. बाप रे! कसले हे वर्णन!
केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली,
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली,
श्वासांनी लिहिली गाथा प्रितीच्या रसाची…
या स्वर्गीय विलयाचा, परिपूर्तीच्या भावनेचा आवेग थोडा ओसरला की, क्षणिक भान येते आणि हे संपायला नको, कधीच संपायला नको, असे वाटू लागते. मग आणाभाका, शपथा अटळ होऊन बसतात. त्या किती हळव्या असतात हे तेव्हा कधीच कळत नाही. उद्या उजाडले की, वास्तवाच्या रणरणत्या उन्हात त्या किती काळ टिकणार आहेत ते माहीत नसते. त्या क्षणी मात्र सगळे इतके रम्य असते की जणू… स्वप्नात दुसरे अधिक रंगीत स्वप्न उलगडावे! केवढे सुखद भास! सुखसुद्धा शुद्ध गमावून बसते. त्याला भोवळ येते, त्याची जाणीवच विझते. मनाचे इतके तादात्म्य, एकतानता साधली जाते की दोन नद्यांचे प्रवाह एकमेकात मिसळून जावेत. अतर्क्य आत्मिक संगमाचे तीर्थच!
सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची…
शब्दांच्या या असल्या वैभवाला, संगीताच्या अमर्याद शक्तीला पुढची पिढी नक्की मुकणार, हे लक्षात आल्यावर हुरहूर लागते. पण कुणाला सांगणार हे दु:ख! माझ्या मराठीची ही श्रीमंती पुढच्या पिढीला समजायला त्यांना मातृभाषा यायला तर हवी!