मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता साथीच्या आजारानेही डोके वर काढले आहे. मुंबईत जूनच्या पहिल्याच आठवड्यात गॅस्ट्रोचे सर्वाधिक ७८ तर मलेरियाचे ५७ रुग्ण आढळले आहेत.
जूनच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे ५ जूनपर्यंत मुंबईत ५७ रुग्ण मलेरियाचे आढळले आहेत. तर सर्वाधिक रुग्ण जी दक्षिण आणि इ वॉर्डमध्ये आढळले आहेत तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात जून ५ पर्यंत डेंगू १०, हेपटायटीस १५ आणि लेप्टोचा एक रुग्ण आढळला आहे. गॅस्ट्रोचे ७८ रुग्ण आढळले आहेत. गेस्ट्रोचे रुग्ण हे सर्वाधिक एच पूर्व म्हणजे वांद्रे पूर्व आणि एच पश्चिम, वांद्रे पश्चिम तसेच इ वॉर्ड मध्ये आढळले आहेत.
दरम्यान, १ जानेवारी ते ५ जून २०२२ पर्यंत अवघ्या ५ महिन्यात ९५० रुग्ण मलेरियाचे आढळले आहेत. तर गॅस्ट्रोचे २४४१ रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे गेस्ट्रोचे आहेत. तर मे मध्ये गॅस्ट्रोचे ६३० रुग्ण आढळले होते.
एकीकडे पालिकेसमोर पुन्हा एकदा कोरोना रुग्ण संख्या कमी करण्याचे आवाहन असताना आता साथीच्या आजाराचे पुन्हा एक आव्हान पालिकेसमोर उभे राहिले आहे.