नवी दिल्ली : भारताची दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राजने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून सन्यास घेतलाय. गेल्या 23 वर्षांपासून मैदान गाजवणाऱ्या मितालीने वयाच्या 39 व्या वर्षी सर्व प्रकारच्या क्रीकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे आज, बुधवारी जाहीर केले.
मिताली ने भारतासाठी 333 सामने खेळून 10,868 धावा केल्या आहेत. अर्जुन पुरस्कार विजेती आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त मितालीने 1999 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पदार्पण केले आणि पुढील 2 दशकांमध्ये सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक बनली. कर्णधार म्हणून, मितालीने भारताला 2015 आणि 2017 या दोन विश्वचषकांच्या अंतिम फेरीत नेले. मिताली राजने 7 एकदिवसीय शतके आणि 1 कसोटी शतकांसह तिची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली. तसेच भारताची दिग्गज फलंदाजांपैकी एक कसोटीमध्ये मितालीने 4 अर्धशतके झळकावली, तर वनडेमध्ये 64 अर्धशतके आणि टी-20 मध्ये 17 अर्धशतके झळकावली आहेत.
निवृत्ती संदर्भातील ट्वीटमध्ये मिताली म्हणाली की, “तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे. जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.” असे तिने आपल्या ट्विटमध्ये नमूद केलेय. तसेच “मला मिळालेल्या सर्व पाठिंब्याबद्दल मी बीसीसीआय आणि सचिव जय शाह यांचे आभार मानू इच्छिते – प्रथम एक खेळाडू म्हणून आणि नंतर भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार म्हणून.”
मिताली राजने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मितालीला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीटमध्ये जय शाह म्हणाले की, “एक अद्भुत कारकीर्द संपुष्टात येते! मिताली राज, भारतीय क्रिकेटमधील तुमच्या अतुलनीय योगदानाबद्दल धन्यवाद. मैदानावरील तुमच्या नेतृत्वामुळे राष्ट्रीय महिला संघाला गौरव प्राप्त झाला आहे. मैदानावरील या शानदार खेळीबद्दल अभिनंदन आणि पुढील डावासाठी शुभेच्छा!” अशा शब्दात शाह यांनी आपले मनोगत व्यक्त केलेय.