मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नसला, तरी सत्ताधारी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रचाराचा नारळ कधीच फोडून टाकला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर शाब्दिक हल्ले सुरू आहेत. येत्या निवडणुकीत महापालिकेवर शिवसेनेचा की भाजपचा भगवा फडकणार? याबाबत प्रचंड उत्सुकता व चर्चेला ऊत आला आहे. त्यातच सट्टा बाजारही जोरात असून त्यात भाजपची चलती असल्याचे दिसून येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला प्रस्थापित विरोधी लाटेचा मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याचा अंदाज सट्टा बाजारात वर्तविण्यात येत आहे. याबाबत ‘द हिंदू बिझनेस लाइन’ने वृत्त दिले आहे. बीएमसीवरील वर्चस्वासाठी भाजप आणि शिवसेनेकडून सर्वस्व पणाला लावले जात आहे. मुंबई मनपाचे बजेट तब्बल ५० हजार कोटींचे असून जवळपास ८० हजार कोटींच्या ठेवी आहेत. त्यामुळे ही श्रीमंत पालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी सत्ताधारी आणि विरोधक सर्वस्व पणाला लावणार हे निश्चत.
बीएमसीच्या सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी चार प्रमुख पक्षांमध्ये चुरस आहे. त्यामध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजप, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात २३६ जागांसाठी जोरदार लढत होणार आहे. त्यात भाजपला जवळपास १२० जागांवर विजय मिळण्याची खात्री आहे. सध्याचे ट्रेंड पाहता हा आकडा १३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. बुकी १ रुपया देण्याच्या तयारीत आहेत. या निवडणुकीत भाजपने १२० जागा जिंकल्याबद्दल बुकी प्रत्येक एक रुपयाच्यावर १ रुपया द्यायला तयार आहेत.
१०० पेक्षा जास्त जागांवर भाजपच्या विजयावर सट्टा लावण्यासाठी, बुकींना प्रत्येक रुपयावर ०.२५ पैसे द्यावे लागतील, तर ११० जागांसाठी एक रुपयावर ५५ पैसे इतकी होण्याची शक्यता आहे. जागांच्या संख्येवरील कमी पेआऊट गुणोत्तर असे सूचित करते की, बुकींना राजकीय पक्षाला अनेक जागा जिंकण्याचा विश्वास आहे.
गुजरातमध्येही भाजपला बहुमत
मुंबई मनपा निवडणुकीबरोबर बुकींनी गुजरात निवडणुकीसाठी सुद्धा सट्टा बाजार सुरू केला आहे. गुजरातच्या निवडणुकीला अजूनही सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्या ठिकाणी सुद्धा भाजपला बहुमताने विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सट्टा बाजारातील सूत्रांनी माहिती दिली आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल भाजपकडून निवडणूक लढवतील, असे भाकित बुकींकडून वर्तवण्यात आले आहे. पटेल यांनी अलीकडेच काँग्रेसला रामराम केला आहे. पुढील काही महिन्यात ते भाजपमध्ये सामील होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. पटेल २० ते २५ जागांवर प्रभाव पाडू शकतात, ज्या ठिकाणी पाटीदार समाजाचा प्रभाव आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा किती रॅली करतील, यावर रेट वर-खाली होऊ शकतो, असे बुकींना वाटते.
शिवसेनेसमोर मोठे आव्हान…
शिवसेना बीएमसी निवडणुकीत फक्त १० ते ३० जागा जिंकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे रुपयाला १० पैशांपासून ते ६२ पैशांपर्यंत दर देण्यात आला आहे. तथापि, शिवसेना ४० जागा जिंकल्यास बुकी रुपयावर अडीच रुपये देण्याच्या तयारीत आहेत. शिवसेना ४० जागा जिंकेल, अशी शक्यता बुकींनी वाटत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईला सर्वाधिक तडाखा बसला होता. त्यामुळे येत्या निवडणुकीत शिवसेनेसमोर मोठे आव्हान असेल, यात
शंका नाही.