मीनाक्षी जगदाळे
वैयक्तिक आत्महत्या, कुटुंबातील सदस्यांना जीवे ठार मारून स्वतः आत्महत्या करणे, सर्व कुटुंबाने सामुदायिक आत्महत्या करणे अशा स्वरूपाच्या आजमितीला दररोज वर्तमानपत्रांतून, समाज माध्यमातून बहुतांश बातम्या या वाचायला मिळतात. याबरोबरच मुलाने अथवा मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला, आंतरजातीय, आंतरधर्मीय, खालावलेल्या आर्थिक परिस्थितीमधील कुटुंबात केला, घरी न कळवता परस्पर लग्न लावून घेतले, घरच्यांनी पसंत केलेल्या मुलाला अथवा मुलीला लग्नासाठी नकार दिला यांसारख्या कारणांवरून त्या दोघांनाही अथवा त्यातील कोणाला एकाला कुटुंबातील सदस्यांनी संगनमत करून जीवे मारून टाकणे अशा घटना सातत्याने पाहायला मिळतात. तसेच, एकमेकांवर प्रेम असलेले; परंतु घरातून विवाहाला परवानगी मिळणार नाही ही पक्की माहिती असल्याकारणाने आधीच प्रेमीयुगुलाने एकत्रित आत्महत्या करून जीवन संपवलेल्यांची उदाहरणे समाजात मोठ्या प्रमाणावर घडतात.
मुलांना लहानपणापासून आपण चांगले, वाईट, चूक आणि बरोबर काय आहे, आयुष्यात निर्णय घेण्याचे महत्त्व, चांगल्या वाईट निर्णयांचे आयुष्यावर होणारे परिणाम याबद्दल सांगत असतोच, त्यांच्यावर उत्तम संस्कार देखील करीत असतो. तरीही काही बाबतीत आपल्याच मुलांची मतं आपल्यापेक्षा वेगळी असू शकतात, त्यांचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो हे स्वीकारणे आपल्याला इतके जड का जावे? मुलांना कोणत्याही त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीत जरी तो आपल्याला पटला नसेल तरी त्याचे संभाव्य परिणाम, फायदे-तोटे लक्षात आणून देणे पालक म्हणून नक्कीच आपली जबाबदारी आहे. पण आपल्या सांगण्याला छेद देऊन पण मुलांना त्यांचा अट्टहास मग तो कोणत्याही बाबतीत असो पूर्णच करायचा असेल, तर आपण त्यांना ते व्यक्तिगत स्वातंत्र्य देऊ केले पाहिजे. त्यांना स्वतःला त्या गोष्टीचा अनुभव घेऊन पाहू देणे, त्यांना स्वतःला चांगले वाईट समजणे, त्यांना बाहेरील जग, व्यवहार कळणे, माणसे ओळखणे हे स्वतः शिकू देणे आवश्यक आहे. यातूनही त्यांचा स्वमनाने, स्वमताने घेतलेला कोणताही निर्णय चुकला अथवा त्यांना पश्चाताप झाला तरी पालक म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहणे त्याला परत पाठिंबा देणे, आपल्या पाल्याला सावरणे आणि पुनःश्च नवीन आयुष्य सुरू करायला उमेद देणे आपले कर्तव्य आहे. अशी कितीतरी लग्न आहेत जी पालकांच्या, नातेवाइकांच्या पसंतीने, साग्रसंगीत पद्धतीने होऊनसुद्धा अपयशी ठरली आहेत. अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे पालकांच्या चुकीच्या निर्णयामुळे मुलांचे आयुष्य, भविष्य बरबाद झालेले आहे. त्यामुळे आयुष्यात असा कोणताही मूलमंत्र नाहीये जो अंगिकारला, तर सगळे मानाप्रमाणेच आणि सकारात्मक होईल. त्यामुळे इतक्या खालच्या पातळीचा विचार करताना, आपल्याच मुलामुलीचा जीव घेताना पालकांनी कुठेतरी स्वतःची सद्सदविवेकबुद्धी शाबूत ठेवणे अपेक्षित आहे. अनेक तरुण मुलामुलींनी घरातून आपल्या प्रेमविवाहाला मान्यता मिळणार नाही या भीतीने स्वतःचे आयुष्य संपवलेले आहे. पालकांविषयी इतकी दहशत, इतकी भीती मुलांच्या मनात असणे रास्त आहे का? आपल्या मुलांना रागवण्याचा, ओरडण्याचा, थोडाफार धाक दाखविण्याचा पालकांना हक्क आहे. पण मुलांनी आपल्या भीतीने आत्महत्या करावी यासारखे दुर्दैव पालकांचे काय असू शकते.
जर अपत्य आणि पालक यांच्यामध्ये विश्वासाचा इतका अभाव, संवादात इतकी दरी व इतकी वैचारिक भिन्नता असेल, तर आपणच पालक म्हणून कुठेतरी कमी पडतोय का? यावर विचार होणे आवश्यक आहे. एकीकडे आपण जागतिक मैत्री, जागतिक स्तरावर व्यवहार, परदेशात नौकऱ्या, उद्योग, व्यवसाय, आंतरराष्ट्रीय सलोखा, शांतता, सर्वधर्म समभाव या विषयांचा पुरस्कार करीत असताना, हे विश्वची माझे घर या उक्तीनुसार माणुसकी ही एकच जात आणि तोच एक धर्म ही विचारप्रणाली अंगीकारत असताना आपल्याच समाजात राजरोसपणे घडत असलेल्या अशा घटना पहिल्या की खरंच मन विषण्ण होते. ज्या मुलांना आपण लहानाचे मोठे करतो, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील त्यांना शिक्षण, उत्तम दर्जाचे आयुष्य, राहणीमान देण्याचा प्रयत्न करतो, ज्या पाल्याला आपण फुलासारखे जपतो. त्याचा आपल्याच हाताने जीव घेताना कुठेही जराही या कुकर्माची भीती जन्मदात्या आई वडिलांना, भावांना, इतर नातेवाइकांना वाटत नाही का? प्रत्येक कुटुंबात मतभेद असतात. सख्खे भाऊ बहीण, स्वतःची सख्खी मुले-मुली यांच्या छोट्या-छोट्या आवडी एकमेकांपासून वेगळ्या असतात. कुटुंबात प्रत्येकाच्या आवडी निवडी, सवयी, स्वभाव, दिनचर्या भिन्न असतात तरीही सर्वजण त्यात एकमेकांना सांभाळून घेतात, परस्परांच्या आवडीत, आनंदात समाधान मानतात व त्यालाच कुटुंब म्हणतात; परंतु पालकांच्या पसंतीशिवाय लग्न करणे म्हणजे असा कोणता अक्षम्य गुन्हा आहे ज्याला मृत्यूदंड ही शिक्षा पालकांनी कायदा हातात घेऊन द्यावी.
आपल्या जीवनात अशी कोणतीही समस्या नसते ज्यावर उपाय नाही अथवा पर्याय नाही. गरज असते स्वभाव आणि डोकं शांत ठेऊन, सगळ्यांना विश्वासात घेऊन, आलेल्या समस्या कशामुळे आल्या याची कारणे शोधणे, आपण कुठे चुकलो, कुठे कमी पडलो यावर विचारविनिमय करणे, सातत्याने त्याच चुका परत करण्याचे टाळणे, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मदतीच्या पर्यायांना तपासणे. जात, पात, धर्म, पंथ, समाज, गणगोत या सगळ्याचा पलीकडे देखील दुनिया आहे. गरीबी, श्रीमंती, घराणे, खानदान यापलीकडे देखील आयुष्य आहे आणि ते आपल्या मुलांना अनुभवायचे असेल, जगून पाहायचे असेल, तर त्यांचा जीव घेऊन स्वतःच्या आयुष्याची उर्वरित वर्ष गुन्हेगार म्हणून जगण्यापेक्षा, कायदेशीर शिक्षा भोगत आयुष्य बरबाद करण्यापेक्षा मुलांच्या आनंदात सहभागी होऊन त्यात समाधान मानणे कधीही उचित असेल. सर्व कुटुंबाने मिळून एकत्र आत्महत्या करणे, अथवा सर्व कुटुंबाला ठार मारून स्वतःचे जीवन संपवणे हा प्रकार आजकाल समाजात वाढत चाललेला आहे. मुळात आत्महत्या हे पाप आहे आणि तो कायदेशीर गुन्हादेखील आहे. त्यातून स्वतःच्या कुटुंबातील इतरांना जीवे मारून टाकणे हा अजून गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले, सर्वसामान्य कुटुंबातील लोक जेव्हा असे कृत्य करतात त्यावेळेस जाणवते की, समाजात मानसिक ताण-तणाव किती मोठ्या प्रमाणात वाढीस लागलेले आहेत.
(क्रमश:)