सुखी यशस्वी आणि समृद्ध जीवनासाठी लहानपण अत्यंत आवश्यक आहे. समता सभ्यता सामंजस्य समाधान सहनशक्ती लवचिकता नम्रता हे लहानपणाचे पैलू आहेत. सभ्यता म्हणजे काय? आपण इतरांशी वागताना सौजन्याने सलोख्याने वागणे. इतरांचा आदर राखणे. मान राखणे म्हणजे सभ्यता. ही सभ्यता असेल तर संसारात समस्या येणार नाहीत. समाधान असेल, तर तुमच्या जीवनात सुख-शांती-समाधान-आनंद लाभेल. समाधान म्हणजे इतर लोक म्हणतात “ठेविले अनंते तैसेची राहावे” हे नाही. ही एक बाजू झाली. तुकाराम महाराज म्हणतात “ठेविले अनंते तैसेची राहावे” याची दुसरी बाजू आहे ती म्हणजे माणूस असा नुसताच राहिला, तर त्याची प्रगती होणार नाही. “ठेविले अनंते तैसेची रहावे” याची एकच बाजू घेऊन आज लोक बसलेले आहेत. तुकाराम महाराजांनी सांगितले मग ते प्रमाण. अरे पण, तुकाराम महाराजांचे अभंग निरनिराळया लोकांसाठी, निरनिराळ्या परिस्थितीत सांगितले गेलेले आहेत. एखाद्या घरात कुणाचा तरी मृत्यू झाला, तर हे तुमच्या हातात आहे का? घरातला माणूस गेला की अवेळी तुमचा तोल जाता कामा नये. तुमच्या हातात काही नाही.
आपल्याला दुःख होणारच, का तर तो गेला म्हणून दुःख होणार. तो पुन्हा दिसणार नाही म्हणून दुःख होणार. आपण आकांडतांडव करणार नाही. काही लोक असे मोठमोठ्याने रडतात की ते भयानक वाटते. त्यावेळी त्यांचा तोल गेलेला असतो. संगीतात ताल सांभाळतात तसा जीवनसंगीतात तोल सांभाळावा लागतो. जन्माला आला तो जाणारच. काही लोक लवकर जातात, तर काही लोक उशिरा जातात. अरेरे तो गेला मग तु सुद्धा जाणारच आहेस. तू काय अमर आहेस का. एक मनुष्य वारला. त्याला स्मशानात पोहोचवायला काही मंडळी जातात आणि तिथे चर्चा होतेच. फार वाईट झाले वगैरे वगैरे असे म्हणे म्हणेपर्यंत हाच गेला. याला हार्ट अॅटॅक आला व तो गेला. दादरला एका डॉक्टरने पत्ते खेळत असताना पत्ता टाकण्यासाठी हात वर उचलला तो तिथेच गेला. मृत्यू ही गोष्ट तुमच्या हातात नाही. यमराजाचे कधी आमंत्रण येईल ते सांगता येणार नाही. बोलावणे आले की चला. आमची बॅग तयार आहे. कुठे जायचे ते सांगा. त्यामुळे आपल्याला त्याची भिती वाटत नाही. जी गोष्ट अटळ आहे तिथे विचार करण्याचे काहीच कारण नाही. जी गोष्ट टाळता येण्यासारखी आहे तिथे प्रयत्न केलेच पाहिजेत. जी गोष्ट अशक्य आहे तिथे समाधान पाहिजे. तो गेला तो आनंदात गेला. कळ आल्यासारखी वाटते त्यांना काही होत नाही. घरात कुणीतरी गेले, तर त्याठिकाणी बोंबाबोंब करून आरडाओरड करून उपयोग नाही. इथे “ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान” हे बरोबर आहे.
– सद्गुरू वामनराव पै