डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील आदिवासी भागात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, पिण्याचे पाणी, कृषी विमा योजना, रस्ते, घरकुल योजना, शिक्षण या जीवनोपयोगी योजनांतील त्रुटी आणि त्याद्वारे भेडसावणाऱ्या समस्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत सोडविण्याच्या दृष्टीने तत्काळ पावले उचलण्यात येतील, अशी ग्वाही डहाणूचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी दिली.
आदिवासी भागांत राबविण्यात येत असलेल्या योजनांतील त्रुटींमुळे भेडसावत असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी डहाणू तहसीलदार कार्यालयात नुकतीच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे रडका कलांगडा, एडवर्ड वरठा, लहानी दौडा यांच्या नेतृत्वाखालील पंचवीस जणांच्या शिष्टमंडळासह तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, नगरपरिषद उपमुख्य अधिकारी प्रदीप जोशी, वन अधिकारी, पाणीपुरवठा अभियंता, तसेच विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या महिलांना वाईट वागणूक दिली जाते. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना सर्रास दुसऱ्या रुग्णालयात पाठविले जात असून औषधे आणि सर्व प्रकारचे साहित्य बाहेरून आणण्यास सांगितले जाते. तसेच भरमसाट फी मागितली जाते, असा आरोप लहानी दौडा यांनी या बैठकीत केला. त्यावर मार्ग शोधण्यासाठी ९ मे २०२२ रोजी शिष्टमंडळा समवेत जिल्हा उप रुग्णालयात जाण्याचे निश्चित करण्यात आले.
पाणीपुरवठ्यावर चर्चा करताना कळमदेवी, सोगवे, खुबाळे, मोडगाव, शिसणे डोंगरीपाडा येथील काही आदिवासी लोक खड्ड्यांतील पाणी पीत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर अभिजीत देशमुख यांनी संबंधित अभियंत्यास तत्काळ विंधन विहिरीवरील पंप दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले.
वीटभट्टी, मासेमारी आणि मजुरी निमित्त स्थलांतरित झालेल्या आदिवासींची नावे घरकुल योजनेतून वगळली गेली आहेत. त्यांची नावे तपासाअंती यादीत समाविष्ट करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.