बोईसर (वार्ताहर) : तारापूर-चिंचणी बायपास रस्त्याच्या रुंदीकरणाच्या सुरू असलेल्या कामात ठेकेदाराकडून शेकडो तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे पर्यावरणप्रेमींच्या संतप्त भावना व्यक्त होत आहेत. वनविभागाने पाहणी करून कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी परिसराची पाहणी करून, चौकशी करून उचित कारवाई करण्यात येईल, असे बोईसरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नीलेश मोरे यांनी सांगितले.
बोईसर ते डहाणू मार्गवरील तारापूर-चिंचणी बायपास रस्त्याच्या साईडपट्टी रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्यामार्फत सुरू आहे. हा रस्ता खाजण भागातून जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या संख्येने अतिसंरक्षित तिवरांची झाडे होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण, साईडपट्टीसाठी जवळपास १.७५ कोटींचा निधी मंजूर होऊन ठेकेदाराने प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. मात्र हे काम करताना ठेकेदाराने दोन्ही बाजूंच्या शेकडो तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्याची विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे.
जानेवारीच्या २० तारखेपासून दोन ते तीन दिवस सलग जेसीबी मशीनच्या मदतीने शेकडो लहान-मोठ्या तिवरांची झाडे मुळासकट उखडून बाजूच्या खाडीमध्ये विल्हेवाट लावली आहे. या प्रकाराची तक्रार वनविभागाकडे करूनसुद्धा अद्यापही वनविभागाने ठेकेदारावर कोणतीही कारवाई न करता त्यास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. तिवरांच्या विनाशामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी थेट शेती, बागायती आणि रहिवासी वस्तीत शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
तिवरांची कत्तल करून चार महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील वनविभागाने संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर आणि ठेकेदार यांच्याविरोधात कारवाई केलेली नाही. या प्रकरणी पर्यावरणप्रेमी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.
चार महिने झाले तरी कारवाई नाही
तारापूर-चिंचणी बायपास रस्त्याचे रुंदीकरण आणि साईडपट्टीच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर यांच्या ठेकेदाराने काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिसंरक्षित तिवरांच्या झाडांची कत्तल करून त्याची विल्हेवाट लावल्याचे आम्ही उघडकीस आणले आहे. याबाबतीत वनविभागाकडे कारवाईची मागणी देखील केली होती. याला आता चार महिने होऊनसुद्धा कोणतीच कारवाई न झाल्याने या प्रकरणी आम्ही थेट पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन तक्रार करणार आहोत. – जितेंद्र पाटील, पर्यावरणप्रेमी बोईसर