माथेरान (वार्ताहर) : दरवर्षी माथेरान परिसरात आगीचे वणवे लागण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. त्यामुळे पर्यटनावर निश्चितच दुष्परिणाम होणार असल्याने त्यावर आता नागरिकांना ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
वातावरणात खूपच तफावत दिसत असून या थंड हवेच्या ठिकाणीसुध्दा उष्मा जाणवू लागला आहे. सध्याच्या परिस्थितीत इथे ३८ अंश सेल्सिअस इतके तापमान जाणवत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्यासुध्दा रोडावली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पर्यटकांची इथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. त्यात कमतरता भासू लागली आहे. अनेक भागांत घोड्यांच्या मलमूत्रामुळे तसेच झाडांना घोडे बांधले जात असल्याने अनेक झाडे पावसाळ्यात आपसूकच सुकून उन्मळून पडत असतात.
तसेच येथील गारबट पॉईंट भागात नेहमीच वणवे लागण्याचे प्रकार पाहावयास मिळतात. त्यामुळे हळूहळू इथल्या वनसंपदेवर घाला घातला जात आहे. वनखाते आपल्या परीने कार्यरत आहे तथापि, संयुक्त वनसंरक्षण समितीनेही यासाठी पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे. या नेमलेल्या समितीचे काम हे प्रामुख्याने इथल्या संपूर्ण परिसरातील झाडांची जोपासना, वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन ही आहेत.
पावसाळ्यात वृक्षारोपण करण्याचा दरवर्षी देखावा केला जातो. यामध्ये लाखो रुपयांचा चुराडा केला जात आहे; परंतु, इथली वनराई कशाप्रकारे अबाधित राहून इथल्या पर्यटनाच्या दृष्टीने नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील याकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. हल्लीचे उष्म्याचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे इथली वनसंपदा संपुष्टात येत आहे. ती अधिकाधिक कशी बहरेल आणि हवेत गारवा निर्माण होईल याबाबत ध्येयधोरणे आखणे अपेक्षित असल्याचे सुज्ञ नागरिकांमधून बोलले जात आहे.
माथेरानचे पूर्ण जीवनमान हे येणाऱ्या पर्यटकांवर अभिप्रेत असून येणारे पर्यटक इथल्या थंड हवेमुळेच येतात. मुंबई, पुण्यातील धकाधकीच्या जीवनात आलेली मरगळ दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांना हे ठिकाण आकर्षित करत असते. तथापि, आगीचे वणवे लागत असल्यामुळे संबंधित खात्याने आणि नागरिकांनी लक्ष केंद्रित केले नाही तर आगामी काळात ही संपूर्ण वनराई बेचिराख होईल आणि स्थानिकांना हे गाव सोडून जायची वेळ येईल. त्यासाठी सर्वानी सावध होऊन दरडोई पाच रोपे लावून त्यांची मुलांप्रमाणे देखभाल करणे गरजेचे आहे. – मनोज खेडकर, माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस अध्यक्ष माथेरान.