Thursday, July 18, 2024
Homeअध्यात्मसाईनाथांचा भक्तांना संदेश

साईनाथांचा भक्तांना संदेश

विलास खानोलकर

साईबाबा सांगतात, ‘मी श्रद्धा, सबुरी ठेवली, माझ्या गुरूने माझे कल्याण केले.’ असे साईबाबा म्हणतात. म्हणजेच काय, तर आपणही साईचरणी लीन व्हावे अनन्यभावाने साईंची भक्ती करावी, म्हणजे आपणालाही आयुष्याची सार्थकता लाभेल. भक्ती कशी करावी, याचे विवरण साईबाबांनी किती लीलया केले. त्यांनी ध्यानाचे महत्त्व ज्ञानापेक्षा जास्त आहे, हे आपणास दाखवून दिले. कासवी पिल्लांना ना दूध पाजते, ना चारा देते; पण एकाग्रतेने पिल्लांवर नजर ठेवून त्यांचे रक्षण करते आणि पोषण करते. एकटक नजर लावून आपण साईंचे ध्यान केले, तर मन स्थिर होऊन आपणास द्वैताचा पडदा दूर करता येईल. सर्व प्राणिमात्रांत वास करणारा साईनाथ दर्शन देईल. ज्ञान असणे महत्त्वाचे आहेच; कारण त्याशिवाय त्या वस्तूचे (ब्रह्माचे) ध्यान कसे बरे लागणार! साईंबद्दल माहिती असणे, ज्ञान असणे महत्त्वाचे आहे; परंतु साईंच्या अस्तित्वाचा जर अनुभवच झाला नसेल, तर त्या ज्ञानाचा काय फायदा! म्हणून ध्यान हवे. ध्यास हवा. त्याच्या सतत अनुसंधानात राहायला हवे. आपले विचार साईंना केंद्रस्थानी ठेवून व्हायला हवेत. तरच हित होईल. साईंवर भार टाकून आपली सत्कर्मे करीत राहणे, यातच भक्ती आली, मुक्ती आली, प्रपंचाची शक्ती आली आणि अद्वैताची प्रचीती आली. हे सद्गुरू साईनाथ, तुझा महिमा अगाध, अथांग, अमर्याद आहे. तसाच तो गोड आहे, पुन्हा पुन्हा गावा असाच आहे म्हणून तुला वंदन करून

माझ्या मना नको शिणु
दुःख नको मनी आणू ।।१।।
माझा साई उभा दारी,
माझ्या संसारा सावरी ।।२।।
तुझ्या कृपेची रे आस,
प्रीती खरी, नाही भास ।।३।।
तळमळ तुझ्या पायी,
छत्र धरी माझा साई ।।४।।
तुझ्यासाठी माझी वाणी,
तुझ्यासाठी ही लेखणी ।।५।।
कर्ता – करविता साई,
कसा होऊ मी उतराई ।।६।।

 vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -