रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांवर लावलेल्या ध्वनीक्षेपकांच्या परवानगीसाठी अनेकजण पुढे आले असून पोलिसांकडून नियम आणि अटींचे पालन करत सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत गरजेनुसार परवानगी दिली जात आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला ध्वनीक्षेपकाबाबत दिलेल्या आव्हानामुळे अनेकांनी पोलीस स्थानकात परवानगीचा सिलसिला सुरू केला आहे. मात्र, पोलिसांनी ध्वनीक्षेपकासाठी अटी आणि शर्ती घातल्या आहेत. यामध्ये सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत शांतता असणाऱ्या ठिकाणी १५ डेसिबल, तर निवासी ठिकाण असणाऱ्या ठिकाणी ५५ डेसिबल आणि वाणिज्य विभागासाठी ६५ डेसिबल व औद्योगिक ठिकाणी ७५ डेसिबल हे प्रमाण निश्चित केल्याने त्यापेक्षा आवाज वाढल्यास १ लाख रुपये दंड व उर्वरीत कारवाई केली जाणार आहे, असे पोलिसांनी दिलेल्या संमत्तीपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
जनताही या ध्वनीक्षेपकाचा आवाज मोजू शकते. यासाठी साऊंड मीटर हा अॅप डाऊनलोड केल्यास त्याच्यावर परिसरामध्ये सुरू असणाऱ्या कोणत्याही डिजे, लाऊडस्पीकर यांचा आवाज रेकॉर्ड होऊ शकतो. तसेच त्यावेळच्या वेळेची नोंद अंक्षांश, रेखांश आदीची नोंद होत असल्याने तो स्क्रीनशॉट काढून पोलिसांना दिल्यास अशांवर कारवाई करण्यात येईल. प्रथम त्या परिसरातील बीट अंमलदार, तो न ऐकल्यास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, त्यांनीही याची दखल न घेतल्या उपविभागीय पोलीस अधिकारी किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार होऊ शकते.