Monday, January 20, 2025
Homeकोकणरायगडमराठीतील पहिल्या शिलालेखाला सुवर्ण दिन येणार

मराठीतील पहिल्या शिलालेखाला सुवर्ण दिन येणार

आक्षी येथील दुर्लक्षित शिलालेखाचे अखेर होणार जतन

महाराष्ट्र दिनी परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील आक्षी येथील शिलालेख हा मराठीतील आद्य शिलालेख म्हणून ओळखला जातो. गेली अनेक वर्ष दुर्लक्षित राहिलेल्या या शिलालेखाला आता चांगले दिवस येणार आहेत. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी आक्षी शिलालेख परिसर सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत यासाठी निधी उपलब्ध झाला आहे.

कर्नाटक राज्यातील श्रवण बेळगोळ येथील बाहुबली गोमटेश्वरांच्या मूर्तीखाली लिहिलेला शिलालेख हा मराठीतील पहिला शिलालेख मानला जातो. हा शिलालेख इस १११६-१७च्या दरम्यान कोरला गेला असल्याचे दाखले मिळतात. गंग राजघराण्यातील चामुण्डाराय या मंत्र्याने गोमटेश्वराची मूर्ती तत्कालीन राणीच्या आग्रहास्तव बनवून घेतली. या मूर्तीखाली एक शिलालेख कोरण्यात आला. त्यात कन्नड, तमिळ आणि मराठी भाषा कोरली गेली.

‘श्री चामुण्डाराये करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले’ अशी वाक्ये या शिलालेखावर आढळतात. मात्र, रायगड जिल्ह्यातील आक्षी येथे याहूनही जुना एक शिलालेख आढळून आला आहे. तथापि, पुरातत्त्व विभागाच्या अनास्थेमुळे हा शिलालेख दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. श. गो. तुळपुळे यांच्या संशोधनानुसार हा मराठीतील पहिला शिलालेख असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिलालेखाची निर्मिती शके ९३४ म्हणजे इ. स. १०१२ झाल्याचा स्पष्ट उल्लेख या शिलालेखावर आहे.

आक्षी येथील शिलालेख रस्त्याच्या कडेला दुर्लक्षित अवस्थेत असून, शिलालेखाचे जतन करण्याची मागणी आक्षी ग्रामपंचायत, इतिहास प्रेमी तसेच नागरिकांमधून सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिलालेखाची पाहणी करत शिलालेख जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पुढाकार घेत प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतंर्गत शिलालेख जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

शिलालेखावरील मजकूर

आक्षी येथे खोदकाम करताना सापडलेल्या या शिलालेखावर देवनागरी लिपीत नऊ ओळी कोरण्यात आल्या आहेत. या लिपीवर संस्कृत भाषेचा प्रभाव आहे. पश्चिम समुद्रपती श्री कोकण चक्रवर्ती केसीदेवराययांच्या महाप्रधान भरजु सेणुई याने हा शिलालेख कोरून घेतला असून महालक्ष्मीदेवीच्या बोडणासाठी दर शुक्रवारी नऊ कुवली धान्य देण्याचा उल्लेख इथे करण्यात आला आहे. शके ९३४ मधील प्रभव संवत्सर अधिक कृष्णपक्षातील शुक्रवारी हा निर्णय घेतल्याचा उल्लेख इथे आहे. तसेच शिलालेखाचे विद्रूपीकरण करणाऱ्याला शापही देण्यात आला आहे.

कामाला लवकरच मूर्त स्वरूप येणार

वर्षानुवर्षे हा मराठीतील पहिला शिलालेख रस्त्याच्या कडेला ऊन, वारा, पाऊस झेलत उभा आहे. दरवर्षी मराठी भाषा दिनी त्याचे पूजन केले जात असे. त्याचवेळी त्याचे जतन करण्याची घोषणाही केली जात असे. परंतु रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या शिलालेखाचे जतन करण्याचा चंगच बांधला. पालकमंत्री आदिती तटकरे यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या कामाला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -