सीमा दाते
मुंबई : मुंबई उपनगरातील नालेसफाईच्या कामांना वेगाने सुरू असून या कामांची पाहणी महापालिका अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांनी केली आहे. नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ हा निर्धारित वेळेतच हलविण्याचे निर्देश भिडे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम खाते, एमएमआरडीए यांच्या अखत्यारितील नाल्यांबाबत ज्या ठिकाणी अद्याप कामे सुरू झालेली नाहीत किंवा अपूर्ण आहेत अशी कामे करण्यात यावीत व याबाबत पत्रव्यवहार करण्यात यावे असेही निर्देश भिडे यांनी दिले आहेत.
दरम्यान बुधवारी एल विभाग, एम पूर्व आणि पश्चिम विभाग या ३ विभागांचा तर एन, एस आणि टी या तीन विभागांचा पाहणी दौरा केला. पूर्व उपनगरात ६९ मोठे नाले आहेत. तर ३६० छोटे नाले आणि ३३० इतर छोटे नाले आहेत. या व्यतिरिक्त रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या व कल्व्हर्ट देखील आहेत. या सर्व ठिकाणी सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांचा प्रत्यक्ष व सांख्यिकीय आढावा बुधवारी घेण्यात आला. कांजूरमार्ग येथील मालमोटारीचे व त्यातील सामानाचे वजन मोजणाऱ्या वजनकाट्याची व तेथील कार्यपद्धतीची देखील पाहणी करण्यात आली.
या पाहणी दौऱ्यादरम्यान ‘परिमंडळ – ५’ चे उपायुक्त व ‘परिमंडळ – ६’ चे प्रभारी उपायुक्त विश्वास शंकरवार, एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे, ‘एम पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, ‘एल’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे, ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनावणे, ‘एस’ विभागाचे सहाय्यक आयुक्त अजितकुमार आंबी, ‘टी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, पर्जन्य जलवाहिन्या खात्याचे अभियंता, संबंधीत अभियंता वर्ग आणि महानगरपालिकेचे संबंधीत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.