मुरबाड (प्रतिनिधी) : उल्हास नदी पात्रात सध्या जलपर्णीचा उद्रेक सध्या पहायला मिळत आहे. मागील वर्षीसुद्धा खुप मोठया प्रमाणात जलपर्णी रायते नदी पुलाजवळ अडकली होती. त्यामुळे पाणी दुषित होऊन वेगवेगळ्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. यावेळी अनेक सामाजिक संघटना व स्थानिक नागरिकांनी आवाज उठवून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती.
याकामी पालकमंत्री व ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उपाययोजना म्हणून स्वत: या भागाची पहाणी केली होती. त्यानंतर सगुणा रूरल फाऊंडेशनने नदी पात्रात योग्य ती फवारणी केली आहे. जलपर्णी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मागील पाच-सहा महिने जलपर्णी कुठेही दिसून येत नव्हती. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगुणाबाग रूरल फाऊंडेशनचे कौतुक करून याचा आदर्श पुणे व नाशिक जिल्हातील लोकांनी घ्यावा, असा सल्ला दिला होता. परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून उल्हासनदी पात्रात मोठया प्रमाणात जलपर्णी पहायला मिळत आहे. ही जलपर्णी सध्या वांगणी, बदलापूर भागातून वाहत येताना दिसो.
या परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखान्याचे केमिकल युक्त पाणी, मोठ -मोठ्या गटारांद्वारे सांडपाणी नदी पात्रात सोडले जाते. तसेच काही ठिकाणी निर्माल्य,प्लास्टिक पिशव्या, कचरा, खाद्य पदार्थ नदीपात्रात सोडले जातात. परिणामी पाणी दुषित होऊन जलपर्णीचा धोका निर्माण होत आहे.
या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी व नदीचे नाल्यात रूपांतर होऊ नये यासाठी जनतेला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून सध्यपरिस्थितीचा आढावा त्यांना सादर करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कल्याण ग्रामीणचे सरचिटणीस राम सुरोशी, उपाध्यक्ष विलास सोनावले, रायते येथील सरपंच हरेशजी पवार, श्रीकांत तारमले, भगवान पवार, शरद पवार, संजय सोनावले, दिनेश राऊत व ग्रामस्थांनी सांगितले.